सर्वाधिक नोकरभरती पोलीस खात्यात होणार

आठ महिन्यांत ४,३०० हून अधिक पदांच्या भरतीसाठी जाहिराती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारच्या विविध खात्यांत १० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२१ ते आतापर्यंत म्हणजे आठ महिन्यांच्या काळात सुमारे ४ हजार ३०० हून अधिक नोकऱ्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. यात प्रामुख्याने पोलीस, आरोग्य, गोमेकॉ, मानसोपचार संस्था, वीज, अग्निशमन दल, कामगार आयुक्तालय, राज्य निबंधक आधी विभागांचा समावेश आहे.

हेही वाचाः पैसे मागणाऱ्यांपासून सावध रहा; नोकरभरती पारदर्शक!

वरील आकडेवारीत थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या पदांचा समावेश नाही

वरील आकडेवारीत थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या पदांचा समावेश नाही. तसंच काही जाहिराती २०२० साली प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, त्यांची मुलाखत आणि भरती यंदा झाली आहे. त्यांच्याही आकड्यांचा यात समावेश नाही. १ जानेवारी २०२१ ते आतापर्यंत विविध खात्यांनी पदभरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. त्याच पदांचा आकडा वर दिला आहे. या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोकऱ्या पोलीस खात्यात दिल्या जाणार असल्याचंही सूत्रांकडून समजतं.

पोलीस महासंचालकांनी वर्षारंभी १४५ उपनिरीक्षकांची पदे भरण्यासाठी जाहिरात दिली

पोलीस महासंचालकांनी वर्षारंभी १४५ उपनिरीक्षकांची पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यानंतर काही दिवसांनी ९१३ शिपाई पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. अशाप्रकारे १ हजार ५८ पदांच्या भरतीची जाहिरात ही एका पोलीस खात्याकडून प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय गृहरक्षक दलाने २९६ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. हे जवान पोलिसांप्रमाणेच सेवा बजावतात.
गोवा लोकसेवा आयोगामार्फत ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील राजपत्रित अधिकाऱ्यांची भरती केली जाते. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी, गटविकास अधिकारी, रोजगार विनिमय अधिकारी, साहाय्यक निबंधक या पदांचा यात समावेश आहे.

हेही वाचाः अजून एक युवक हरवळे धबधब्यात बुडाला

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ८२१ रिक्त जागांसाठी भरती

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ८२१ रिक्त जागांसाठी भरती होत असून, त्यात मल्टी टास्कींग स्टाफ, एलडीसी, ज्युनिअर स्टेनो, स्टाफ नर्स, एएनएम, चालक आणि अन्य जागांसाठी २५ मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने २१६ राजपत्रित अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी विविध जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. यात सरकारी महाविद्यालयांतील प्राध्यापक तसंच कनिष्ठ श्रेेणीचे अधिकारी यांची पदं जास्त आहेत.

हेही वाचाः प्रबोधन शिक्षण संस्थेत संस्कृत दिन उत्साहात

वीज खात्याने हल्लीच २४३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली

वीज खात्याने हल्लीच २४३ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंते, मीटर रीडर, लाईनमन तसेच एलडीसी या पदांचा समावेश आहे. त्याखालोखाल सहकारी संस्था निबंधक कार्यालयाने १५४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. यामध्ये कनिष्ठ कारकून, एमटीएस व निरीक्षक यांचा समावेश आहे.

हेही वाचाः काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांची पर्तगाळ मठाला भेट; स्वामीजींचं दर्शन घेतलं

आरोग्य खात्याने १४५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली

आरोग्य खात्याने १४५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. यात एमटीएस, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, फार्मसिस्ट यांचा समावेश आहे. कृषी खात्याने १३२, आयपीएचबीने (मानसोपचार) १००, लेखा संचालनालयाने १०९, कामगार कार्यालयाने ९१, कदंब महामंडळाने ४६ पदे भरण्यासाठी जाहिराती दिल्या आहेत.

– मत्स्योद्योग, नदी परिवहन, कॅप्टन ऑफ पोर्ट, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न आणि औषध प्रशासन, नागरीपुरवठा, कारखाने आणि बाष्पक, राज्यपालांचे सचिवालय तसेच वन व पर्यावरण या खात्यांनीही भरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. मात्र, त्यांचा आकडा २० ते ३० यांच्यामधे आहे.

हा व्हिडिओ पहाः CRIME | CANDLE MARCH | फोंड्यात विद्यार्थी संघटनांतर्फे मेणबत्ती मोर्चा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!