ॲड. विक्रम भांगले यांची ‘एनआरएआय’च्या मानद सचिवपदी बिनविरोध निवड

सलग तिसऱ्यांदा मिळाला पद भूषविण्याचा मान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे सरचिटणीस तथा आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक ॲड. विक्रम उर्फ मेघ:शाम श्रीपाद भांगले यांची भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) मानद सचिवपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

ॲड. भांगले यांची नेमबाजी महासंघाच्या या महत्त्वाच्या पदावर निवड

मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या भारतीय राष्ट्रीय रायफल संघाच्या निवडणुकीत ॲड. भांगले यांची नेमबाजी महासंघाच्या या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे भांगले यांचं भारतीय नेमबाजीच्या विकासात भरीव योगदान राहिलं आहे. गोव्यातही गेली ३३ वर्षे नेमबाजी क्रीडा प्रकाराचा प्रसार करण्यात त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. ते भारतीय नेमबाजी आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय नेमबाजी पंच असून त्यांनी भारतीय कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक म्हणून यापूर्वी काम केलेलं आहे. तसंच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रेंज ऑफिसर व पंच म्हणून काम केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून कामगिरी

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सेऊल जर्मनी, चेक रिपब्लिक, दोहा कतार, मेक्‍सिको, सिंगापूर, इत्यादी अनेक देशांत भारतीय संघासोबत प्रशिक्षक म्हणून त्यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली आहे. सदर स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अनेक पदके मिळालेली आहेत. त्यांची अकापुल्को मॅक्‍सिको येथे झालेल्या शॉटगन वर्ल्डकपसाठी भारतीय वरिष्ठ शॉटगन संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली होती. तसंच पुणे येथे ७ व्या ऑल इंडिया पोलिस शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलिस दलाने स्पर्धा अधिकारी म्हणून निवड केली होती. दिल्ली येथे आठव्या एशियन एअर वेपन शुटिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड केली होती. आशिया ऑलिम्पिक क्‍वॉलिफाईंग कॉम्पिटीशन स्पर्धेसाठी व बाराव्या साऊथ एशियन गेम्स्‌साठी ज्यूरी म्हणून निवड झाली होती. याशिवाय दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ नेमबाजी स्पर्धेतही त्यांनी दोनवेळा रेंज ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. जर्मनीतील इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनने त्यांची जागतिक युवा नेमबाजी स्पर्धेसाठी रेंज ऑफिसर म्हणून निवड केली होती.

सलग पाचव्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या कार्यकारिणीवर प्रतिनिधीत्व

ॲड. विक्रम भांगाले हे सलग पाचव्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या कार्यकारिणीवर प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे सरचिटणीस आहेत. एन.सी.सी. महाराष्ट्राचे मानद प्रशिक्षक राहिले आहेत. गोवा राज्य नेमबाजी संघाचे ते मुख्य प्रशिक्षक आहेत. ते इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्टस फेडरेशनचे (जर्मनी) मान्यताप्राप्त ज्युरी असून जागतिक नेमबाजी संघटनेने त्यांची ज्युरी व प्रशिक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. याशिवाय विक्रम रॉयल रायफल शॉटगन शुटिंग क्‍लबचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नेमबाजी स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके प्राप्त केलेली आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. रायफल शुटिंग असोसिएशन गोवाचे सचिव राजेश परब यांनी ॲड. भांगले यांच्या राषनट्रीय कार्यकारिणीवर झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!