हडफडे अपघात! मृत पावलेली युवती पुण्यातील मराठी अभिनेत्री

सोमवारी पहाटे झाला होता अपघात; मराठी अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुण्यातील तरुण आणि एक तरुणी गोव्यात कार अपघातात मरण पावले आहेत. ही तरुणी मराठी तसेच हिंदी सृष्टीत कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केलं होतं. आपल्या मित्रासोबत ती गोव्याला आली होती. गोव्यातील हणजूण समुद्रकिनाऱ्याकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यातच त्यांचे निधन झालं.

गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे ही तिचा मित्र शुभम देडगे याच्यासोबत गोव्याला गेली होती. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अंजुना बिचकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. पार्क रिव्हर हॉटेल जवळ एक खाडी आहे सुरुवातीला त्यांची भरधाव वेगात असलेली गाडी नियंत्रण सुटून एका झाडाला जोरदार धडकली. त्यानंतर त्यांची गाडी ५० ते ६० मीटर पलटी होत तिथल्या खाडीत कोसळली. ही माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी ताबडतोब अग्निशमन दलाला दिली. काही वेळात या जवानांनी गाडीचे लॉक तोडून त्या दोघांना बाहेर काढले. पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेत ईश्वरी मदतीसाठी ओरडली होती, असं उपस्थितांनी सांगितलं होतं. मात्र मदत मिळण्या आधीच ईश्वरीचा मृत्यू झाला होता.

पुढच्या महिन्यात होता अभिनेत्रीचा साखरपुडा

ईश्वरी देशपांडे (वय २५) ही पुण्यातील सुस परिसरात वास्तव्यास होती, तर तिच्यासोबत असलेला तिचा मित्र शुभम देडगे (वय २८) हा नांदेड सिटी परिसरात राहत होता. हे दोघेही काही महिन्यात लग्न करणार होते, अशी माहिती आता समोर येत आहे. पुढच्याच महिन्यात त्या दोघांनी साखरपुडा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानंतर ते लग्नही करणार होते. ईश्वरी आणि शुभम दोघेही कित्येक वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखत होते.

काही चित्रपटात केलं होतं काम

ईश्वरीने मराठी सृष्टीत काही म्युजिक व्हिडिओत काम केलं आहे. तर काही ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंगही केलं आहे. मराठी सोबतच हिंदी सृष्टीतूनही तिला अभिनयाची संधी मिळाली होती. नुकतेच तिने काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले होते, तर काही प्रोजेक्टचं काम थोडंसं अपूर्ण राहिलं होतं. हे प्रोजेक्ट पूर्ण होण्याअगोदरच आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या भीषण अपघातात ईश्वरीचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Electricity Issue | नेत्रावळीतील महिलेनं व्यक्त केला संताप

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!