RG | मनोज परब यांना पुन्हा दिलासा…

फौजदारी दंड संहितेच्या कलमांतर्गत केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्दबातल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : करोना कालावधीत मार्गदर्शक तत्त्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब याच्यासह इतर दोघांवर होता. याप्रकरणी वाळपईतील उपजिल्हाधिकाऱ्यांनी रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब याच्यासह इतर दोघांवर कारवाई केली होती. फौजदारी दंड संहितेच्या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सोमवारी रद्दबातल केली आहे.

फौजदारी दंड संहितेच्या कलम १११ नुसार नोटीस

करोना महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरजीचे मनोज परब, विरेश बोरकर आणि आलेक्स रिचर्डसन डिसोझा यांना नोटीस बजावण्यात आली होती. वाळपई पोलिसांच्या अहवालानुसार फौजदारी दंड संहितेच्या कलम १११ नुसार ही नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार तिघांना उपजिल्हाधिकारीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. तसंच त्यावेळी १० हजार रुपये सुरक्षा बाँड जमा करून सहा महिन्यासाठी शांतता राखण्याचा हमी देण्यास सांगितलं होतं.

हेही वाचाः ठरलं एकदाच! आरजी निवडणुकीत उतरणारच, घोषणा झाली

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान

मनोज परब याच्यासह इतर दोघांनी १७ सप्टेंबरला उपजिल्हाधिकारीच्या कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडली. असं असताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या बाजूची दखल न घेता त्यांना सहा महिन्यासाठी दर बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजता वाळपई पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचा आदेश जारी केला. या आदेशाला वरील तिघांनी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान दिलं.

हेही वाचाः जमीन मालकीच्या लढ्यात ‘आरजी’ सत्तरीवासीयांसोबत – मनोज परब

गोवा खंडपीठाकडून आदेश रद्दबातल

न्यायालयाने ८ जानेवारी २०२१ रोजी त्यांची आव्हान याचिका फेटाळून लावली. या आदेशाला खंडपीठात आव्हान दिलं. या प्रकरणी खंडपीठाने सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तसंच न्यायालयाने जारी केलेले आदेश रद्दबातल करून याचिका निकालात काढली. तसंच उपजिल्हाधिकाऱ्यांना नवीन आदेश जारी करण्याची मूभा दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!