दक्षिण गोवा वजन माप विभागाची कारवाई

सात लाखांचा माल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः वस्तूंवर उत्पादकांचं नाव, पत्ता, तारीख, महिना, उत्पादन वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंग तारीख आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्यात न आल्याने गोवा वजन माप विभागाने ठिकठिकाणी छापे मारून सुमारे सात लाख रूपयांच्या वस्तू जप्त केल्या. नागरिकांनी कोणतीही वस्तू विकत घेताना योग्य ती सावधगिरी बाळगावी, असं आवाहन दक्षिण गोवा वजन माप विभागाचे सहाय्यक नियंत्रक नितीन पी. पुरुशन यांनी केलं आहे.

हेही वाचाः पोलीस भरती : पावसामुळे निवड चाचणी लांबणीवर

सध्या पावसाचे दिवस असल्याने लोक छत्री, रेनकोट घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्या वस्तू विकताना वजन मापच्या मार्गदर्शन तत्त्वांची अमलबजावणी होते की नाही यासंबंधी दक्षिण गोवा वजन माप विभागाने लिगल मेट्रोलॉजी अक्ट २००९ आणि नियम २०११ नुसार मोहिम राबविली होती. त्या मोहिमेंतर्गत काहीजण त्यांच्या तावडीत सापडले.

हेही वाचाः आंबोलीत ‘सुसाईड’चा थरार ; 200 फुट दरीतून युवतीला वाचवलं !

मडगावातील मालभाट येथे दोन आणि चंद्रावाडा फातोर्डा येथे एका दुकानातील रेनकोट, छत्र्यांची तपासणी करण्यात आली असता विक्रेत्याने मार्गदर्शन तत्वांना बगल दिल्याचं आढळून आलं. त्या दुकानांतील ६८४ छत्र्या आणि ५१५ रेनकोट जप्त करण्यात आले. ही कारवाई सहाय्यक नियंत्रक देमू मापारी यांनी पास्कॉल वाझ, ज्ञानेश्वर गावस यांच्या सहाय्याने आणि नितीन पुरुशन यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

हेही वाचाः पॉलिटेक्निक परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात

कुडचडे येथे तीन दुकानांवर छापे मारून तांदळांची १७ गोणी जप्त करण्यात आली. सदर कारवाई निरीक्षक विकास कांदोळकर यांनी दामोदर पावसकर, लॉर्डिस पिंटो यांच्या मदतीने केली. म्हापसा येथेही अशाच प्रकारची कारवाई करताना तांदळाच्या २५ गोणी जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई सहाय्यक नियंत्रक गुलाम ए. गुलबर्ग यांनी दत्तकुमार शेट आणि नीतेश नावेलकर यांच्या मदतीने केली. कायदेशीर मेट्रोलॉजी कायदा २००९ आणि नियम २०११ च्या विविध तरतुदींचं उल्लंघन केल्याबद्दल त्या वस्तू जप्त केल्या आहेत.

हेही वाचाः मी प्रियोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार

ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी पुढील नमूद केलेल्या अनिवार्य गोष्टींची तपासणी करावी. वस्तूंवर उत्पादक, पॅकर, आयातकाचे नाव, संपूर्ण पत्ता हवा. वस्तू कुठून आयात केली, त्या देशाचं नाव, उत्पादन कालावधी, पॅकिंगपूर्वीची तारीख, महिना, आयात तारीख, महिना, जास्तीतजास्त किरकोळ किंमत आणि इतर गोष्टी पाहाव्यात. तक्रारीबाबत कोणाकडे संपर्क साधावा त्या व्यक्तीचं नाव, कार्यालयाचे नाव, संपूर्ण पत्ता, इमेल पत्ता, संपर्क क्रमांक छापला की नाही हे पाहिलं पाहिजं, असं आवाहन पुरुशन यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!