मडगावात वजन-मापे खात्याची कारवाई

६९६ छत्र्या, २१४ रेनकोट जप्त; तांदळाच्या पोत्यांवरही जप्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: वजन व मापे खात्यातर्फे मडगाव परिसरातील मालभाट येथून ६९६ छत्र्या व २१४ रेनकोटची पॅकेटस तसंच अंतर्वस्त्रांची २५०० पॅकेटस ताब्यात घेण्यात आली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या साहित्यावर उत्पादकाचे नाव, पत्ता, उत्पादन कधी केले अशाप्रकारची माहिती नसल्याने ही कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले आहे. वजन व मापे खात्याचे निरीक्षक देमू मापारी यांनी साहाय्यक नियंत्रक नितीन पुरुशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर गावकर, पास्कोल वाझ व नितेश नावेलकर यांच्या सहकार्यातून ही कारवाई केली.

हेही वाचाः कोविडबाधितांचे मृत्यू लपवले नाहीत

उत्पादनाविषयी आवश्यक माहिती नाही

मालभाट मडगाव येथे जप्त केलेल्या छत्र्या व रेनकोटवर उत्पादकाची माहिती, उत्पादित केल्याची तारीख व महिना याची माहिती नव्हती. अंतर्वस्त्रांच्या पॅकेटवरही उत्पादनाबाबतचे महिना व वर्ष देण्यात आलेले नाही. वजन व मापे कायदा २०११ चे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः संतोष, रवींकडून आज मंत्र्यांची वैयक्तिक शाळा!

तांदळाच्या पोत्यांवरही जप्ती

याशिवाय पॉवर हाउसनजीक तेलंगणा पासिंग असलेल्या गाडीतून तांदळाच्या २५ किलोच्या १०० पिशव्या ताब्यात घेण्यात आल्या. या तांदळाची विक्री करताना पिशव्यांवर उत्पादकाचे नाव, पत्ता व सहायता क्रमांक हे दिसून न आल्याने ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः बारावीच्या निकालाची गुणपद्धत कशी असावी?

जागो ग्राहक जागो

ग्राहकांनी अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, महिना, वर्ष यासह आवश्यक माहिती तपासून घ्यावी. असे केल्याने ग्राहकांची फसवणूक होणार नाही, असं वजन व मापे खाते निरीक्षक देमू मापारी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!