दवर्लीत पोलिसांकडून कारवाई; बाजार अखेर बंद

प्रशासनाला आली जागः कर्फ्यूचं झालं होतं उल्लंघन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात कर्फ्यू लागू असतानाही दवर्ली हाउसिंग बोर्ड येथे भल्या पहाटे भरविल्या जाणाऱ्या मासळी बाजाराचा भंडाफोड झाला. पोलिसांनी बुधवारी पहाटेच हा बाजार बंद पाडला. स्थानिकांनीही पोलिसांना याकामी सहकार्य केलं. व्हिन्सेंटनगर परिसरात पहाटेच्या वेळी खुलेआम सुरू असलेल्या मासळी बाजारावर सुरुवातीला प्रशासनाकडून दुर्लक्ष झालं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांना कारवाई करणं भाग पडलं.

हेही वाचाः आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?, काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांचा कामतांवर घणाघात

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मायणा कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर म्हणाले, आम्ही पॉवर हाउस येथे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. येथून ये जा करणाऱ्या प्रत्येक वाहनावर पोलीस नजर ठेवून आहेत. दवर्लीत पहाटे भरणाऱ्या मासळी बाजाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या भागात काही मासळी एजंटांनी समांतर मासळी बाजारच सुरू केला होता. भल्या पहाटे चार वाजेपासून येथे लगबग सुरू होत असे. स्थानिकांना त्याचा जाच सहन करावा लागत आहे. कोविड महामारीमुळे गर्दी टाळणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं बनलं असताना या मासळी बाजारामुळे या नियमांचा फज्जा उडत होता.

पोलिसांसोबत ‘त्याचं’ सेटिंग

बॉबी नावाच्या एका इसमाचा या मासळी बाजाराला आश्रय होता. पोलिसांकडे आपलं सेटिंग आहे असं तो बिनधास्तपणे सांगत होता. दहा – बारा गाड्यांतून येथे मासळी उतरविली जात होती. नंतर सायकलने मासळी विक्री करणारे आणि अन्य लोक येथे मासळी घेत होते. राज्यात कर्फ्यू  असून, आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली बॉबीवर कारवाई करण्याची मागणीही आता स्थानिकांकडून होत आहे.

हेही वाचाः हायकोर्टानं तरुण तेजपालप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, २ जूनला काय होणार?

रस्त्यावर मासळी व फळे विकणाऱ्यांवर कारवाई कधी?

रस्त्यावर मासळी व फळे विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायतीतर्फे कोलवा पोलिसांना केली आहे. येथील होलसेल मासळी मार्केटजवळील रस्त्यावर मासळी व फळे विक्री होते. सकाळच्या वेळी येथे पोलीस तैनात करावे, असंही मागणीत म्हटलं आहे. पंचायतीतर्फे आमदार चर्चिल आलेमाव यांच्याकडे वरील प्रकाराची मागणी करण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!