मेळावलीतील हल्ला पूर्वनियोतच! पोलिसांचा दावा

पोलिसांकडून 23 जणांवर गंभीर गुन्हे; एकाला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : शेळ-मेळावली प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर दडपशाही केल्याचे स्पष्ट असूनही सरकारने मात्र आंदोलक ग्रामस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निश्चित केलेय. बुधवारी शेळ- मेळावलीत झालेली हिंसक घटना ही नियोजितबद्ध असल्याचा ठपका ठेवून 23 जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आलेत. यापैकी विश्वेष प्रभू परब याला अटक करण्यात आलीय. शेळ-मेळावलीवासियांना पाठींबा दर्शवण्यासाठी दाखल झालेल्या विरोधकांना टीपून काढून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलिसांनी सर्वांनाच अचंबित करून टाकलंय.

EXCLUSIVE VIDEO | विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि मेळावलीवासियांचा आक्रोश

सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावलीतील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाविरोधात तेथील स्थानिकांचे गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आयआयटी प्रकल्पासाठी जमिन संपादनास स्थानिकांचा विरोध आहे. या जमिनी सरकारी असल्याचा सरकार दावा करीत असले तरी पूर्वापारपासून या जमिनी कसत आलो आहोत आणि त्यामुळे या जमिनींचा अधिकार आमचा आहे,असा दावा करून स्थानिकांकडून या जमिनीच्या मालकीची मागणी होतेय. हा प्रकल्प अन्यत्र कुठेही हलवा, अशी मागणी स्थानिक करीत आहे. यापूर्वी काणकोण आणि नंतर कुंकळ्ळी येथून लोकविरोधानंतर हा प्रकल्प रखडला होता. आता तो सत्तरीत उभारण्याचं सरकारनं ठरवलंय.

वाळपईचे आमदार विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या प्रकल्पाबाबत ठाम आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प इथेच उभारणार असा शब्द त्यांनी दिल्लीत दिल्याने सध्या स्थानिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाची कार्यवाही करण्याचा चंगच त्यांनी बांधलाय.

सीमांकनासाठी मेळावलीकर पोलिसांचे आक्रमण

आयआयटी प्रकल्पाच्या जमिनीचे सीमांकन करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू करण्यात आली. यासाठी शेकडो पोलिसांचा फौजफाटा पाठविण्यात आला. आंदोलक शेळ- मेळावलीवासियांना पोलिसांचा गराडा घालून नकळतपणे अधिकाऱ्यांना रानात पाठवून सीमांकन पार पाडण्यात आले. ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात येताच ते आक्रमक बनले. स्थानिक लोक आक्रमक बनलेत आणि ते हिंसक बनू शकतात याची पूर्ण जाणीव असूनही बुधवारी पुन्हा एकदा पोलिस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच पोलिस आणि स्थानिकांत झटापट झाली. ह्यात पोलिसांबरोबरच स्थानिकही मोठ्या प्रमाणात जखमी झाले. पोलिसांनी लाठ्या आणि अश्रुधुराचा वापर करण्याचाही प्रकार घडला.

मेळावलीवासियांची वाळपई पोलिस स्थानकावर धडक

पीआय सागर एकोस्कर पुन्हा चर्चेत

सर्वांत प्रथम शेळ-मेळावलीत आंदोलकांची पत्रकार परिषद उधळून लावल्याने वादात अडकलेले वाळपईचे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर पुन्हा एकदा अडचणीत आलेत. बुधवारी आंदोलनावेळी त्यांनी एका महिलेच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाण्याचा प्रकार घडला. हा प्रकार कॅमेरामध्ये बंद झाल्याने ते अगदीच सापडलेत. त्यांच्या बडतर्फीची मागणी स्थानिकांनी केलीय पण सरकारने मात्र एकोस्कर यांना पूर्ण सरंक्षण दिलंय. सागर एकोस्कर यांना रजेवर पाठवून लोकांचा राग शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

EXCLUSIVE | बघाच! पोलिसानं दिला महिलेच्या पोटावर पाय

विरोधकांवर शरसंधान

शेळ-मेळावलीतील या आंदोलनाची संधी साधून सरकारने सर्व विरोधकांना टीपले आहे. बुधवारच्या घटनेचे निमित्त साधून शेळ-मेळावलीवासियांना पाठींबा देण्यासाठी तिथे दाखल झालेले आणि हिंसक प्रकरणात कुठेच सहभागी नसलेल्या सर्व विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज्य सरकारच्यावतीने पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी तक्रार दाखल केलीय. पोलिसांवर नियोजनबद्ध हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्याचे नियोजन 5 जानेवारी रोजी करण्यात आले. यासाठी शस्त्रांचा वापर केला,अशा आशयाची तक्रार त्यांनी नोंदवलीय आणि त्यावरून गुन्हा शाखेने 23 जणांविरोधात गुन्हे दाखल केलेत.

कुणाकुणाला अटक?

यापैकी विश्वेष प्रभू परोब याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली तर उर्वरीतांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. गुन्हा दाखल केलेल्यांत शैलेंद्र वेलिंगकर, रामा काणकोणकर, डायना त्रावासो, शंकर देवळी, निखिता नाईक, उन्नती मेळेकर, पुजा मेळेकर, संध्या मेळेकर, शुभम शिवोलकर, प्रियेश नाईक, शशिकांत सावर्डेकर, शशिकला सावर्डेकर, विश्वेष प्रभू परब, दशरथ सांगोडकर, रणजित राणे, जनार्धन भंडारी, दशरथ मांद्रेकर, संकल्प आमोणकर, सचिन भगत, रोशन देसाई, मनोज परब, रोहन कळंगुटकर व इतर ग्रामस्थ असा उल्लेख करण्यात आलाय. पोलिसांची हत्या करण्याचा प्रयत्न, मालमत्तेची नासधुस, सरकारी कामांत व्यत्यय, बेकायदा जमाव, नियोजनबद्ध हल्ला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!