गोवा माईल्सच्या मद्यधुंद चालकानं महिलेला उडवलं…

बाणावलीतील प्रकार, स्थानिकांकडून टॅक्सीचालकाला चोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : गोवा माईल्सच्या मद्यधुंद चालकानं भिंडीवाडा-बाणावलीत एका महिलेला ठोकर दिली. या अपघातात महिलेचा एक पाय जायबंदी झाला. घटनास्थळावरून पळून जाताना या कारचालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

गोवा माईल्स टॅक्सीसेवेविरोधात वातावरण तापत असतानाच बाणावलीतील अपघातामुळे गोवा माईल्स पुन्हा चर्चेत आलीय. गोवा माईल्सच्या मद्यधुंद चालकानं भिंडीवाडा-बाणावलीत एका महिलेला ठोकर दिली. या अपघातात महिलेचा एक पाय जायबंदी झाला. अपघातानंतर त्या महिलेला मदत करण्याचं सौजन्य न दाखवता कारचालक घटनास्थळावरून पळून जाऊ लागला. मात्र जागरूक स्थानिकांनी पाठलाग करून कारचालकाला पकडलं. या दरम्यान गोवा माईल्सच्या कारची धडक बसून एका कारचं नुकसानही झालं. स्थानिकांनी त्या चालकाला पकडून आधी चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं.

भाडं मारण्यासाठी जात होता भरधाव…

हॉलिडे इन हॉटेलमधील एका व्यक्तीला आणण्यासाठी हा कारचालक जात होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. हॉटेलकडे सुसाट वेगानं जात असताना त्यानं महिलेला ठोकर दिली. यात स्कुटरचंही नुकसान झालं. त्यानंतर कारचालकानं तिथून धूम ठोकली. भरधाव वेगानं पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याच्या कारची अन्य एका कारला धडक बसली. त्यामुळे संबंधित कारचालकानं कारचा वेग वाढवून या टॅक्सीला पुढे रोखलं. त्यावेळी ती कार गोवा माईल्सची असल्याचं कळलं. टॅक्सीचालक दारूच्या नशेत धुंद होता. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देण्याच्या स्थितीत तो नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या काहींनी त्याला चोप दिला. त्यानंतर जखमी महिलेला रुगनणवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आलं, तर मद्यधुंद टॅक्सीचालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!