ACCIDENT | मोरजीतील अपघातात एकाचा मृत्यू

गुरुवारची घटना; चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

मोरजीः येथील न्यूवाडा भागात २३ रोजी सकाळी ९ वाजता एक अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. आपल्या सायकलने तेथीलच एका हॉटेलात कामाला जाणारा आगोस्तीन ऊर्फ काल्लू फर्नांडिस यांना समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला शिवोली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. त्यांची स्थिती गंभीर असल्याचं पाहून त्यांना तिथून जीएमसीत नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात

जीए ११ बी ७९६१ ही दुचाकी आश्वे- मांद्रे येथील युवती चालवत होती. अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की ही युवती सुसाट वेगाने वाहन चालवत होती. तिच्याकडे लायसन्स नसल्याचंही बोललं जातंय.

संशयित युवतीविरुद्ध गुन्हा दाखल

याविषयी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीचं वय अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यासाठी तिचा जन्मदाखला मागवला आहे. दाखला आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. बेजबाबदारपणे वाहन चालविल्याबद्दल पेडणे पोलिसांकडून संशयित युवतीविरोधात २७९ आणि ३०४ ए या भारतीय दंड संहिता कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृतदेहाची शवचिकीत्सा करून संध्याकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर 24 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तम कलाकार

आगोस्तीन फर्नांडिस हे ६६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा-सून, पत्नी, भाऊ-भावजय असा मोठा परिवार आहे. आगोस्तीन फर्नांडिस चांगल्यापैकी तीयात्रामध्ये भूमिका करायचे. त्यांना कातरा गायची आवड होती. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने नारळाच्या झाडावर चढून सूर काढत असत. हल्ली हा व्यवसाय धोक्यात आल्यानं त्यांनी तो व्यवसाय सोडून मोरजी येथे एका हॉटेलमध्ये नोकरी स्वीकारली होती. ते फुटबॉलप्रेमी होते.

त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!