ACCIDENT | बायथाखोल बोरीत अपघातांचं सत्र सुरूच; ट्रक-कारची टक्कर

मंगळवारी दुपारची घटना; अपघातात चौघेजण जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यातील बेकार झालेले रस्ते, भटकी गुरं इ. कारणांमुळे अपघातांची प्रकरणं वाढली असल्याचं बोललं जातंय. बायथाखोल बोरी येथील रस्ता तर अपघातांसाठी प्रसिद्ध होत चाललाय. या रस्त्याची झालेली दुर्दशा, त्यामुळे या मार्गावर अनेकवेळा भयंकर स्वरुपाचे अपघात झालेले ऐकू येतात. मंगळवारी या ठिकाणी भयंकर अपघात झाल्याचं समजतंय.

मंगळवारी दुपारची घटना

मंगळवारी दुपारी फोंडा तालुक्यातील बायथाखोल बोरी येथे एक मोठा अपघात झाल्याचं समोर येतंय. टाटा झेस्ट कार आणि टीपर ट्रकमध्ये टक्कर झाल्यानं अपघात झालाय. टीपर ट्रक हा बोरीतून उसगावच्या दिशेने चालला होता, तर कार मडगावच्या दिशेने चालली होती. हा अपघात एवढा मोठा होता की यात कारच्या दर्शनी भागाचा पूर्ण चक्काचूर झालाय. तर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन एका बाजूला कलंडला आहे.

कसा झाला अपघात?

बायथाखोल बोरी येथील रस्ता हा अपघातांसाठी प्रसिद्ध आहे. या मार्गावर बहुतेकवेळा मोठे अपघात होतात. या मार्गावर अपघात होण्यासाठी बरीच कारणं आहेत, जसं की अरूंद रस्ता, गाड्यांची वर्दळ, रस्त्याच्या मधोमध फिरणारी भटकी गुरं, या रस्त्याची झालेली दुर्दशा इ. कारणांमुळे इथे बरेच अपघात होत असतात. मात्र हा अपघात नक्की कसा झालाय याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

अपघातात चौघे जखमी

अपघात जरी मोठा असला तरी थोडक्यात निभावलं. या अपघातात ४ जण जखमी झाल्याचं समजतंय, सुदैवाने जिवीतहानी ठळली आहे. जखमींमध्ये झांसी (२४), अंजु (२५), ड्रायव्हर चंदन भारत (२७) आणि प्रवीण कुमार (२६) यांचा समावेश आहे. चौघेही हैदराबाद येथील रहिवासी असल्याचं समजतंय. अपघातातील जखमींना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. जखमींवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी स्थानिक पोलिस दाखल झाले आणि त्यांनी या अपघाताचा पंचनामा सुरू केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!