ACCIDENT | फोंडा – सावईवेरे मार्गावरील कदंबा बसचा अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी
फोंडाः राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. रोज अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणे, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत. सोमवारी सकाळी फोंडा-सावईवेरे मार्गावर एक अपघात घडलाय.
कुणाचा अपघात?
सोमवारी सकाळी फोंडा-सावईवेरे मार्गावर मोठा अपघात झाल्याचं समजतंय. एका मिनी कदंबा बसचा अपघात झाल्याचं समोर आलंय. आपेव्हाळ-केरी इथल्या जंक्शनवर सावईवेरे-फोंडा मार्गावरून जाणार्या कदंबा बसचा अपघात झाला आहे. बस रस्त्याकडेच्या गटारात गेल्यानं कलंडली. मुख्य रस्ता चुकून ही बस रस्त्याच्या बाजूला जाऊन एका बाजूने आडवी झाली आहे.
नक्की कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार अपघातस्थळी एक वळण आहे. या वळणावर कदंब चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि कदंबा गटारात गेली. बस गटारात गेल्यानं एका बाजूनं कलंडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवासी भांबावले आणि सगळ्यांनी एकच आरडाओरडा सुरू केला.
सुदैवाने जिवीतहानी टळली
सुदैवाने या अपघातात कोणतीच जिवीतहानी झालेली नाही. या बसमध्ये प्रवासी असल्यानं यातील काहींना मुका मार लागला आहे. तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये केपे येथील नेगन सावंत (वय वर्षं 52), खांडोळा येथील बस कंडक्टर सुष्मा गावडे (वय वर्षं 45) तसंच आडपई येथील धनश्री नाईक (वय वर्षं 30) यांचा समावेश असल्याचं समजतंय. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असल्याचं समजतंय. त्यांना फोंड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलंय. तिथं पाचजणांना प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला, तर धनश्री नाईक या महिलेला मार लागल्यानं बांबोळीच्या जीएमसीत दाखल करण्यात आलं आहे.
अपघाताचं नेमकं कारण गुलदस्त्यात
अपघाताबद्दल समजता स्थानिक पोलिसांनी तात्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. त्या अगोदर तिथे उपस्थित असलेल्यांनी धावपळ करून प्रवाशांना बाहेर काढलं. या अपघातात कदंबा बसचं बरंच नुकसान झालं आहे. कदंब बसच्या पुढच्या बाजूला मार लागला असून बसची काच फुटली आहे. या अपघातामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.