ACCIDENT | मुरमुणेत चिऱ्यांची वाहतूक करणारा ट्रक नदीत पडला

शुक्रवारी सकाळची घटना; सुदैवाने जिवीतहानी नाही; क्रेनच्या मदतीने ट्रक नदीतून बाहेर काढला

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्यातील गुळेली ते मेळावली दरम्यान लागणाऱ्या मुरमुणे येथे चिऱ्यांची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा विचित्र अपघात झालाय. ट्रक नदीत कोसळल्याने ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बरेच प्रयत्न करून या ट्रकला नदीबाहेर काढण्यात यश आलंय.

शुक्रवारी सकाळची घटना

हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणी चालवल्या जातात. सध्या या चिरेखाणींत चिरे काढण्याचं काम सुरू असल्यामुळे या भागातून बरेच ट्रक रस्त्यावर भरधाव वेगाने धावताना दिसतात. अशीच चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला शुक्रवारी सकाळी अपघात झाल्याचं समजतंय.

वाहनाला वाट देताना ट्रक पडला नदीत

GA01T8347 या क्रमांकाचा ट्रक नदीत कोसळला. हा ट्रक चिरे घेऊन मेळावली भागातून गुळेलीच्या दिशेने जाताना हा अपघात घडल्याचं बोललं जातंय. समोर आलेल्या वाहनाला वाट देण्याच्या नादात हा ट्रक रगाडा नदीच्या पात्रात कोसळला. सुदैवाने ट्रक चालक तसंच ट्रकमध्ये असलेल्या दोन कामगारांनी प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र ट्रक नदीत पडल्याने ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

क्रेनच्या मदतीने ट्रक नदीतून बाहेर काढला

ट्रक नदीत कोसळल्याची बातमी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. धावपळ करत क्रेन मागवण्यात आली. आणि क्रेनच्या मदतीने ट्रक पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. सध्या राज्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रगाडा नदीच्या पात्राला संरक्षक भिंत नाहीये. या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने असे अपघात या भागात चालूच असतात, असं स्थानिकांकडून समजतंय. तरी भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून या ठिकाणी संरक्षक भिंतीचं बांधकाम करण्यात यावं, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरलीये.

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | गोवेकरांनी बाहेरील लोकांना आमंत्रित करू नये : लांबा


 


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!