माणसांना प्रवेश मात्र वाहनांना बंदी…

सिंधुदुर्ग - गोवा प्रशासनाचा अजब कारभार

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातील दोन डोस घेतलेल्या नागरिकांना दोन्ही ठिकाणच्या प्रशासनानं जिल्हा प्रवेश दिला आहे. मात्र याउलट त्याच प्रवाशांना दोन राज्यांत व विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेली आंतरराज्य कदंब व बस वाहतूक सुरू न केल्याने नागरिकांची प्रचंड गरसोय होत आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवाशी वाहनांना सुद्धा प्रवेश दिला जात नसल्याने काम धंद्यानिमित्त गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना सीमेपलीकडून पायपीट करावी लागत आहे. माणसांना प्रवेश मात्र वाहनांना बंदी…असा अजब कारभार सध्या गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनानं चालविल्याने ‘कोरोना’ नेमका माणसांना की वाहनांना असा उद्विग्न सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाचा जगभर कहर आहे. यावर्षी मार्च नंतर गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने नागरिक व वाहनांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाबंदी लागू केली होती. मात्र अलीकडे रुग्णसंख्या दोन्ही ठिकाणी कमी झाल्याने व ज्यांनी कोविड लसीकरणचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना सिंधुदुर्ग व गोवा अशा दोन्ही प्रशासनाने जिल्हाबंदी नियम शिथिल केले आहेत. मात्र याच प्रवाशांना सिंधुदुर्ग व गोवा राज्यात ने आण करणाऱ्या कदंबा, एसटी व खाजगी बसेसना प्रवाशी वाहतूक बंदी कायमच ठेवली आहे.

एका ठिकाणी प्रवाशी, नागरिक आपल्या खाजगी वाहनांने, पायी दोन डोस घेऊन सीमा ओलांडू शकतात. मात्र अगदी याउलट या प्रवाशांना घेऊन त्या बसेस सीमा ओलांडू शकत नाही, असा गजब कारभार सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, बांदा, वेंगुर्ला, सावंतवाडी या भागातील हजारो तरुण-तरुणी गोव्यातील विविध कंपन्यात कामाला आहेत. त्या सगळ्यांची सध्या फरफट सुरू आहे.

दोडामार्ग तालुक्यात उसप व मोर्ले, घोडगेवाडी अशा तर सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी, बांदा, रेडी, आरोंदा, शिरोडा, वेंगुर्ला याठिकाणी मोठ्या प्रमाणात कदंबा, एसटी बसेस व गोव्याच्या खाजगी बसेस या नोकरदार वर्गाला ने आण करतात. मात्र सध्या ही वाहतूक सीमेवर येऊन थांबत असल्याने या साऱ्यांना पुन्हा सीमेवरून गाव, शहर व बसस्थानक गाठण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. खरं तर प्रशासनानं कोरोना फैलावणाऱ्या माणसांना सीमाबंदी न करता वाहनांना प्रवेश बंद करून नेमकं काय साधायचे ठरवले आहे, हे त्यानांच ठाऊक. मात्र या साऱ्याचा त्रास रोजंदारीवर आणि नोकरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नोकरदार वर्गाला विशेषतः महिला व तरुणींना बसत आहे.

दोडामार्ग तालुक्यात येणाऱ्या कदंब व खाजगी बस तर सीमेवरून मागे परतून लगतच्या पेट्रोल पंपवर उभ्या करून ठेवल्या जात असल्याने तेथून अर्धा किलोमीटर पायपीट करून शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं गोव्यातील कदंबा व खाजगी बसेसना आता जिल्ह्यात प्रवेश द्यावा. मुळात आता कमी झालेली रुग्णसंख्या शिवाय ८० ते ९० टक्के युवकांचे झालेले कोविड लसीकरण यामुळे किमान आता चतुर्थी सणांवर तरी बसेस सुरु करून नोकरवर्गाला सहकार्य करावे, असे पत्र दोडामार्ग तालुक्यातील गोव्यात बसेसने कामाला जाणाऱ्या नोकरवर्गाने दिले आहे.

गोवा बस सेवा तत्काळ सुरू करावी, यासाठी आता भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज त्यांनी दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देत लक्ष वेधलं आहे. दोडामार्ग ते गोव्यात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी गोवा बसेस बंद असल्यामुळे त्याचा बाजारपेठवर मोठा परिणाम होत आहे. शिवाय नोकरदार वर्गाचेही हाल होत आहेत. त्यामुळे कोरोनांचे नियम अटी घालून गोवा राज्यातून दोडामार्ग बाजारपेठेत येणाऱ्या बस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष लवू मिरकर, समीर रेडकर, विष्णू रेडकर, प्रमोद कोळेकर, स्वप्नील गवस, दिलीप आसोलकर, प्रवीण गवस, संदेश गवस, विनायक खडपकर, कल्पेश गवस, रामदास पालकर, अभिमन्यू गवस आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!