मडगावात सुमारे ६४ हजारांची रोकड लंपास

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव: पाजीफोंड येथील शोरूम परिसरात पार्क केलेल्या महिलेच्या दुचाकीतून सुमारे ६४ हजार २५० रुपये रोकड असलेली बॅग चोरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित सांतानो फर्नांडिस (५४, रा . वेर्णा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
२४ सप्टेंबरची घटना
ही घटना २४ रोजी सकाळी ७.३० ते ८ यादरम्यान घडली. नुवे ते मडगावच्या दिशेने आपल्या कार्यालयात जाण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तक्रारदार जॉकीना फर्नांडिस (५३, रा. सुरावली) यांचा संशयित सांतानो याने कारने पाठलाग केला. जिल्हा इस्पितळ परिसरात संशयिताने महिलेच्या हाताला धक्का दिला आणि कार्यालयापर्यंत पोहोचेपर्यंत पाठलाग सुरूच ठेवला. जॉकीना या कार्यालय परिसरात दुचाकी पार्क करताना संशयिताने त्यांच्या दुचाकीची डिकी खुली केली आणि त्यात ६४ हजार २५० रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पळ काढला.
पोलिसात तक्रार नोंद
जॉकीना यांनी पोलिसात तक्रार नोंद केली आहे. चोरीला गेलेली रक्कम ग्राहकाकडून गोळा केली होती, असं जॉकीना यांनी तक्रारीत नोंद केलं आहे.