देशभरातील सुमारे 6 ते 8 हजार युवक सैन्य भरती प्रक्रियेसाठी गोव्यात

'पीपल ऑफ फोंडा'तर्फे प्रक्रिया भरतीसाठी येणाऱ्या युवकांना मुलभूत सुविधा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार आणि सर्व प्रकारची नोकरभरती ठप्प झालेली असतानाच सैन्य दलातील भरतीमुळे देशातील विविध भागांतील युवावर्गात चैतन्य संचारलं आहे. दुर्दैवाने गोव्यातील युवावर्गात सैन्य भरतीची फारशी उत्कंठा नसली तरी देशभरातील युवावर्ग या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतो. भारतीय सेनेतर्फे 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत फोंड्यात सैन्य भरती प्रक्रिया सुरू केली असून देशभरातील सुमारे 6 ते 8 हजार युवक या भरती प्रक्रियेसाठी गोव्यात येणे अपेक्षित आहे.

‘पीपल ऑफ फोंडा’तर्फे मुलभूत सुविधा

भारतीय सेनेतर्फे 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी पर्यंत फोंड्यात सैन्य भरती प्रक्रिया सुरू केली असून देश भरातील सुमारे 6 ते 8 हजार युवक या भरती प्रक्रियेसाठी गोव्यात येणे अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सदर प्रक्रिया गोव्यात होत आली असून दरवर्षी या भरतीसाठी येणारे युवक परिसरातील पदपथावर झोपणं, उघड्यावर नैसर्गिक विधी करणं असले प्रकार करायचे. यंदा फोंड्यातील ‘पीपल ऑफ फोंडा’तर्फे या युवकांना शौचालय तसंच जेवण आणि निवाऱ्याची सोया करण्यात आली असून या कामी मुख्यमंत्री तसंच कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं ‘पीपल ऑफ फोंडा’चे डॉ. रघुनंदन यांनी सांगितलं.

हेही वाचाः Myanmar coup| म्यानमारमध्ये सत्ता पालट

सैनिकी अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान

यंदा सैनिकी अधिकाऱ्यांनी देशभरातून सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांना मूलभूत सुविधा पुरावण्यासबंधी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. या युवावर्गाला मूलभूत सुविधा देण्याबरोबरच फोंडा शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘पीपल ऑफ फोंडा’ आणि अनिल कोरडे यांनी मुख्यमंत्री व मंत्री गोविंद गावडे यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आणि त्यात बऱ्यापैकी या मिळाल्याचे डॉ. रघुनंदन यांनी सांगितलं.

‘पीपल ऑफ फोंडा’तर्फे मोफत जेवण

आपण आपल्या सैन्य दलाबद्दल भरभरून बोलतो,  त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करतो. मात्र गोव्यातून सैन्य दलात भरती होणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. मात्र देश भारतातून  सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ‘पीपल ऑफ फोंडा’तर्फे या युवकांना मोफत जेवण पुरविण्याचं संस्थेने ठरवलं असून सदर उपक्रम सुरू करण्यात आल्याचंही डॉ. रघुनंदन यांनी सांगितलं. 

मदतीसाठी आवाहन

सदर भरती प्रक्रिया येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत चालणार असून प्रतिदिन सुमारे 500 ते 600 युवकांच्या जेवणाचा खर्च ‘पीपल ऑफ फोंडा’ उचलत आहे. यासाठी प्रतिदिन सुमारे 60 हजार रुपये खर्च अपेक्षीत असून या कामी मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांनी ‘पीपल ऑफ फोंडा’च्या भारतीय बँकांच्या शाखेत 6210241296 या खात्यात निधी जमा करण्याची विनंती डॉ. रघुनंदन यांनी पुढे बोलताना केली.  शिवाय ज्या लोकांना रोख स्वरूपात मदत करणं शक्य आहे त्यांनी फोंड्यातील सावंत बर्डेर्सचे प्रमोद सावंत किंवा एसबीएस एन्टरप्रायझेसचे विपीन शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही डॉ. रघुनंदन यांनी केलं.

हेही वाचाः टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही दिलासा नाही!

देशासाठी गोवा आदर्श

दरम्यान, सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांसोबतच सैन्य दलातील अधिकऱ्यांनीही ‘पीपल ऑफ फोंडा’च्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. गोव्याने देशभरात एक आदर्श घालून दिल्याची प्रतिक्रिया सदर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!