भाज्यांवर मिळणारे कमिशन कोणाच्या घशात?

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : सरकारचं नागरी पुरवठा खातं कांदा 32 रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकू शकते, तर फलोत्पादन महामंडळ हाच कांदा 75 रुपये प्रति किलो इतक्या भरमसाट दरानं का विकते? हे कमिशन कोण खातो, असा सवाल आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या पेट्रिसिया फर्नांडिस यांनी केला.
नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री गोविंद गावडे यांनी कांद्याची विक्री बंद करण्याच्या दिलेल्या धमकीमुळे त्यांच्यावर टीका करत आपनं निशाणा साधला. पेट्रिसिया फर्नांडिस म्हणाल्या, गोव्यातील स्वयंपाकामध्ये अतिशय महत्वाचा घटक असणारा कांदा खुल्या बाजारात 120 रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध होता. नागरी पुरवठा खाते कांदे 32 रुपये प्रति किलो या दराने विकत होते, तर फलोत्पादन महामंडळ 75 रुपये प्रति किलो या दराने विकत आहे. फलोत्पादन महामंडळामध्ये भ्रष्टाचार होत असून अनेक लोकांना कमिशन दिले जात आहे. कांद्याची किंमत वाढण्यामागचे हे कारण आहे.
उत्सवाचे भोजन तरी सुखाने घेऊ द्या!
केवळ काही लोकांनी कांद्याच्या दरामध्ये दोन वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये दारात तफावत का आहे, असा प्रश्न केल्यानं कुणी थेट विक्री बंद करू, अशी धमकी देण्याची गरज नाही. लोकांच्या गरजाविषयी सरकार अतिशय असंवेदनशील आहे आणि जे याचा विरोध करून प्रश्न विचारीत आहेत, त्यांना धमकावून दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आवश्यक अशा सर्व वस्तूंच्या किंमती विशेषतः कांद्याचे दर तातडीने खाली आणले जावेत आणि गोव्याच्या जनतेला निदान या दिवाळीला तरी उत्सवाचे भोजन सुखाने घेता यावे, अशी इच्छा फर्नांडिस यांनी व्यक्त केली.