वास्कोवासीयांच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतुकीवर बंदी घाला!

आम आदमी पक्षाची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दरवर्षी वास्कोत दिवाळीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते व रात्री उशिरापर्यंत लोकांची बाजारात वर्दळ असते. कार्गो लादलेली वाहने पोर्टच्या दिशेने भरधाव येत असल्याने जीवघेणे अपघात होण्याचा धोका ‘आप’ने व्यक्त केला आहे. अवजड वाहनांना सायंकाळी 5 ते 7 पर्यंत बंदी आहे. ही बंदी रात्री 9 वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी आपतर्फे केली आहे.

आम आदमी पक्षाच्या वास्को शाखेतर्फे उपजिल्हाधिकार्‍यांना या संदर्भात निवेदन दिले असून चिखली सर्कल ते एमपीटी दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक उत्सवाच्या दिवसांमध्ये रात्री 9 वाजेपर्यंत प्रतिबंधित करावी, अशी मागणी केली आहे. आपचे कार्यकर्ते लॉरेन्सो लिओ दासिल्वा म्हणाले, वास्कोतील नागरिक या भागामध्ये उत्सवासाठी खरेदी करण्यासाठी येतात. बहुतेकजण आपल्या मुलांनाही घेऊन येतात. अवजड वाहनांना आत येण्यास परवानगी असल्याने वास्कोतील नागरिक अपघातांना बळी पडून जखमी होऊ नयेत, असे आम्हाला वाटते.’

सुनील लोरन म्हणाले, ‘दिवाळी हा प्रकाशाचा आणि समृद्धतेचा उत्सव आहे. अशा प्रकारचा शुभ उत्सव सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना आम्हाला कोणतेही अपघात झालेले नको आहेत, ज्यामुळे वास्कोतील लोकांना त्रास व मनस्ताप होईल.’

परशुराम सोनुर्लेकर म्हणाले, ‘यापूर्वी अनेक अपघात होऊन लोकांचा जीव गेला आणि बरेचजण जखमीही झाले आहेत. अशा घटना आणखी घडता नयेत. त्यामुळे वास्कोवासीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही हे निवेदन दिले आहे. अवजड वाहनांची प्रवेश व वाहतूक बंदीची वेळ रात्री 9 वाजेपर्यंत वाढवावी व त्याची अंमलबजावणी 12, 13 आणि 14 नोव्हेंबरपर्यंत करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर अ‍ॅडव्होकेट सुनील लॉरेन, लॉरेन्सो लिओ डिसिल्वा आणि परशुराम सोनुर्लेकर यांच्या सह्या आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!