गोमंतकीयांशी खोटं बोलणं बंद करा!

'आप'चा नीलेश काब्राल यांना इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नायक (Valmiki Nayak) यांनी वीजमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांच्यावर टीका करताना त्यांनी गोमंतकीयांशी खोटं बोलणं बंद करावं, असं म्हटलंय.

काब्राल यांच्याशी विजेच्या विषयावर बोलण्यास वा चर्चा करण्यास ते इच्छुक आहेत. काब्राल यांनी म्हटले होते की ते हा विषय कुठल्याही गोमंतकीय व्यक्तीबरोबर चर्चा करण्यास तयार आहेत. काब्राल यांनी आम आदमी पक्षाला सार्वजनिक वादविवादाचे आमंत्रण देताना वीज पुरवठा विषयावर चर्चेसाठी बोलावले होते. “आप “चा एखादा आमदार दिल्लीहून चर्चेसाठी येत असेल, तर त्याच्यासाठी होणारा प्रवासाचा खर्चही आपण प्रायोजित करणार, असे आश्वासन दिले होते. पण दिल्लीचे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राघव चड्डा (Raghav Chadha) काब्राल यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आव्हान स्वीकारून गोव्यात आले, त्यावेळी काब्राल म्हणाले की, ते फक्त दिल्लीच्या वीजमंत्र्यांबरोबर चर्चा करू इच्छितात.

वाल्मिकी नायक यांनी काब्राल यांच्यावर टीका करताना त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आणि स्पष्ट केले की, आपण गोव्याच्या मातीतीलच एक सुपुत्र आहोत आणि काब्राल यांच्याबरोबर चर्चा करण्यास इच्छुक आहोत. राघव यांच्याकडून आपल्याला कुठलाही फोन कॉल आला नाही, या काब्राल यांनी केलेल्या मखलाशीवर वाल्मिकी यांनी म्हटले आहे की, राघव यांनी सर्व पत्रकारांच्या समोर काब्राल यांना फोन केला होता.

वीज बिलांबाबत संताप

सर्व ठिकाणी गोव्यातले लोक भरमसाट वीज बिलांबाबत निषेध आणि विरोध व्यक्त करीत आहेत. दिल्लीतल्या लोकांना शून्य वीज बिल येताना गोवेकरांना वीजबिलांचा फटका बसत आहे आणि लोकांना त्रास होत नाही, असे काब्राल कसे म्हणू शकतात, असा प्रश्न वाल्मिकी यांनी केला. दिल्ली प्रशासनाचा 60 टक्के खर्च केंद्र सरकार उचलते, या विधानावरही आक्षेप नोंदवत वाल्मिकी म्हणाले की, दिल्लीच्या 60 हजार कोटी बजेटमध्ये 350 कोटी रुपये फक्त केंद्रातून दिले जातात. गोव्यात जनतेसाठीच्या कल्याणकारक योजनांच्या लाभार्थ्यांना अजूनही आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. मात्र दिल्ली सरकार लॉकडाउनच्या मंदीच्या काळातही नव्या योजना जाहीर करत आहे. दिल्ली सरकार लॉकडाउनच्या काळात 7.5 किलोचे अतिरिक्त राशन आपल्या लोकांसाठी वितरित करणार आहे आणि हा लाभ 7.1 दशलक्ष लोकांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये ज्येष्ठांचे पेन्शन 2, 250 पासून 4, 500 रुपयांपर्यंत कोविडच्या काळात वाढविण्यात आले आणि इकडे गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना अनेक महिन्यांपासून पेन्शनच मिळालेले नाही. केजरीवाल सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ यात्रेची योजना बनविलेली आहे. दिल्लीत विधवा महिलांना 2, 500 रुपये दर महिन्याला दिले जातात आणि महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत असते. गोव्यात लाडली लक्ष्मी योजना आणि गृह आधार योजना शीतपेटीत बंद आहेत, असा टोला वाल्मिकी यांनी लगावला.

शिक्षण, आरोग्य सुविधेबाबत जागतिक स्तरावर कौतुक

संपूर्ण जगाने दिल्लीतील सार्वजनिक शिक्षण व्यवस्था वाखाणली आहे आणि हावर्ड विद्यापीठाने त्यावर अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपला हीच व्यवस्था गोव्यात आणण्यासाठी काय समस्या आहे, हे आपल्याला समजत नाही, अशी टीका वाल्मिकी यांनी केली आहे. दिल्लीत असलेल्या मोहल्ला क्लिनिकमध्ये मोफत उपचार व सर्जरी केली जाते व संपूर्ण जगाचे लक्ष या मोहल्ला क्लिनिक प्रणालीने वेधून घेतलेले आहे आणि इकडे गोव्यात खासगी असो किंवा सरकारी हॉस्पिटल, औषधे फुकट दिली जात नाही की उपचारही मोफत नसतात. लोकांनी कुठले सरकार चांगले आहे, हे ठरविण्यासाठी प्रोटोकॉलचे निमित्त पुढे न करता या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे वाल्मिकी नायक यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!