मुख्यमंत्र्यांना शौचालय सुविधा योजनाही मार्गी लावणे शक्य नाही का?

आम आदमी पक्षाचा प्रश्न, हागणदारीमुक्त राज्य हा खोटारडेपणा असल्याची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा भाजप सरकारवर शरसंधान करताना भाजपवर खोटारडेपणा आणि फसवेगिरी केल्याचा ठपका ठेवला आहे. “आप”ने म्हटले आहे की राज्यातील भाजप सरकारने खोटारडेपणा आणि फसवेगिरी करून गोव्यातील गरीब व सर्वसामान्य लोकांचे पैसे स्वतःच्या खिशात घातले आणि एवढा मोठा गाजावाजा केलेले बायो-टॉयलेट्स म्हणजेच जैव शौचालये पुरविण्यात सरकार अयशस्वी ठरले आहे. भाजपने केलेली ही राजकीय स्तरावरची फसवणूकच म्हणायला हवी, असे मत आम आदमी पक्षाने व्यक्त केले आहे.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदेश तेलेकर यांनी म्हटले, “गोवा राज्य हे अधिकृतरित्या हागणदारीमुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे जी घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली. तरीही संपूर्ण गोव्यामध्ये हजारो लोक असे आहेत जे अजूनही उघड्यावर जाऊन शौचविधी उरकताना आम्हाला पाहायला मिळतात “.

काही मुद्द्यांकडे लक्ष वेधताना संदेश तेलेकर म्हणाले की सांगे तालुक्यातील चार गावांमधील 150 कुटुंबांकडे त्यांच्या घरी शौचालय सुविधा उपलब्ध नाही. संदेश पुढे म्हणाले की सरकारने लोकांना बायो टॉयलेट सुविधा उभारण्यासाठी पैसे भरायला लावले पण या गोष्टीला एक वर्ष होत आले तरीही ही सुविधा अजून त्यांना मिळालेली नाही. हागणदारीमुक्त हे विशेषण जैव शौचालयांची खात्याकडे आलेल्या अर्जाच्या संख्येवरून ठरविण्यात वा घेण्यात आले, पण वस्तुस्थिती अशी आहे की गोवा हागणदारी अथवा खुल्यावर शौच करण्याच्या सामाजिक समस्येपासून अजूनही मुक्त झालेले नाही. ते हागणदारीमुक्त केवळ माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये झालेले आहे, अशी पुष्टीही तेलेकर यांनी बोलताना जोडली.
संदेश तेलेकर यांनी बोलताना काही प्रकारांचाही भांडाफोड केला. तेलेकर यांनी सांगितले की आपल्या गावाला हागणदारीमुक्त म्हणून घोषित करावे असा दबाव सरपंचांवर घालण्यात आला. यासाठी या गावांना फक्त काही दिवसांसाठी दाखविण्यापुरते मोबाईल टॉयलेट देण्यात आले. ही मोबाईल शौचालये आता काढून घेऊन गेलेले आहेत.

“ही मोबाईल शौचालये केवळ मोजक्याच अशा काही ठिकाणी लावण्यात आली आणि लोकांना हे टॉयलेट वापरायला उठाठेवी कराव्या लागल्या. लोकांना ते वापरण्यासाठी तब्बल 7 किलोमीटर चालत जाण्याचीही पाळी आली होती, असे तेलेकर यांनी नमूद केले. सर्वसामान्य माणसाला या बायो टॉयलेटच्या भानगडीपोटी 5 हजार रुपये द्यावे लागले, इतर मागासवर्गीय जातीच्या लोकांना 2,500 रुपये तर अनुसूचित जमाती वर्गातील आमच्या बंधू – भगिनींना 1, 500 रुपये भरावे लागले आणि एवढे पैसे भरूनही आजही या लोकांना उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्यासाठी जावे लागते, असे तेलेकर म्हणाले. “या गरीब लोकांना आपली शौचालये कधी मिळतील याची माहिती घेण्यासाठी पंचायतींच्या कार्यलयात अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत पण त्यांना कुठलेही उत्तर कोणीही देत नाही ” असे संदेश म्हणाले. पंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण त्या त्या वॉर्डमधील ज्या लोकांनी बायो टॉयलेट सुविधेसाठी पैसे भरले होते त्यांना टॉयलेट मिळालेले नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले हे लोक चिडून पंचायत कार्यालयात येऊन पंचायत सदस्यांना त्रास देत आहेत तसेच काही सदस्यांना अशा लोकांच्या शिवराळ व घाणेरड्या शिव्याशाप आणि दूषणांचाही त्रास सहन करण्याची पाळी आली आहे. हे लोक आता आपला कष्टाचा आणि घामाचा पैसा त्यांनी लुटला असल्याचा ठपका पंचायत सदस्यांवर ठेऊन आता त्यांना हैराण करीत आहेत, असे तेलेकर म्हणाले.

तेलेकर पुढे म्हणाले, “टॉयलेटसाठी भरलेल्या पैशांशिवाय लोकांनी अतिरिक्त 500 रुपये स्टॅम्प पेपर आणि इतर आवश्यक दस्तऐवज आणि कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्यासाठी बायो टॉयलेटसाठी अर्ज करताना भरले होते. सरकारकडे स्वच्छ भारत अशी जाहिरात करण्यासाठी पुरेसा पैसा आहे आणि इकडे लोक पैसे भरून अजूनही त्यांच्या जैव शौचालय सुविधेसाठी वाट पाहत बसले आहेत हा एक मोठा विरोधाभास नव्हे तर काय? “. तेलेकर यांनी अशीही एक खोचक पुष्टी जोडताना पुढे म्हटले, “निधी उपलब्ध नसलेल्या भाजप सरकारला गरीब आणि सर्वसामान्य लोकांशी खोटे बोलून आणि त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे ओढून घ्यावे लागतात हे निश्चितच दुर्दैवी नव्हे काय? “

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!