सत्तरीतील जनतेला पाणी पुरवण्यात राणेंना अपयश!

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : आम आदमी पक्षाचे सत्तरीतील नेते विश्वेश प्रभू यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला नळ भेट देताना सत्तरी तालुक्यातील लोकांना नळाच्या पाण्याचा पुरवठा करण्यात गेली बरीच वर्षे अपयश आल्याबद्दल निषेध केला. माणिकवाडा-बुद्रुक करमळी येथील रहिवासी विश्वेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेऊन सत्तरी तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटले.
विश्वेश प्रभू म्हणाले, राणेंच्या प्रतिनिधित्वाला 35 वर्षे झाली, तरी लोकांना अजूनही जलवाहिनीचे पाणी मिळालेले नाही. राणे या भागाचे नेतृत्व करतात. वाळपईचे आमदार तथा मंत्री विश्वजित राणे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता भाजपमध्ये आहेत. तरी फरक पडलेला नाही. घरी पाणी येत नसेल, तर नळ असून काय उपयोग म्हणून आम्ही नळ परत द्यायला आलो होतो. हा भाग गोव्याचा भाग नसल्याचे दिसते. कारण लोकांकडे आजही शौचालये नाहीत आणि लोक उघड्यावर शौच व नैसर्गिक विधी उरकतात. रस्त्यावर विजेचे दिवे अथवा स्ट्रीटलाईटची सुविधा नाही, लोक अंधारात जगतात. रस्ते तर अस्तित्वातच नाहीत. लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल चालत जावे लागते. गावातील एकुलती एक विहीर गेली कित्येक वर्षे साफ करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या विहिरीतले पाणी आज वापरता येत नाही.
यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना तक्रारीची लेखी प्रत देण्यात आली. नक्कल प्रत मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याचे विश्वेश प्रभू यांनी नमूद केले.