गोमंतकीय अभियंत्यांना शौचालय बांधकामं आणि बिगरगोमंतकीयांना रस्त्यांची कंत्राटं?

'आप"चे सुरेल तिळवे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील अभियंत्यांना देऊ केलेल्या नव्या नोकरीच्या पर्यायांविषयी आपने टीका केलीय. सावंत यांनी गोव्यातील अभियंत्यांना टॉयलेट बांधण्याची ऑफर दिलेली आहे. याबद्दल त्यांचा निषेध करत असल्याचं आम आदमी पक्षाचे प्रवक्ते ऍड. सुरेल तिळवे यांनी म्हटलंय.

गोव्यातील युवकांना चांगल्या प्रकारचा रोजगार देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेय. हे अपयश झाकण्यासाठी गोव्यातील युवकांना टॉयलेट बांधकामाचे काम हाती घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री करत आहेत. यामुळे रोजगार देण्यात त्यांच्या पक्षाला आलेलं अपयश झाकलं जाईल, असं त्यांना वाटतंय, असं तिळवे म्हणाले. गोव्यातील युवकांना टॉयलेट बांधण्यास सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अपमान केलाय. इतर सर्व पायाभूत विकास प्रकल्पांसाठी त्यांना अदानीसारखी बाहेरची माणसे पाहिजेत, असा टोला तिळवे यांनी हाणला आहे.

इंजिनीयरची गवंड्यांशी तुलना अयोग्य!

टॉयलेटचा आराखडा इंजिनीअर तयार करतात आणि टॉयलेट बांधणे हे गवंडींचे काम असते. म्हणजे मुख्यमंत्री हे इंजिनीअरची तुलना गवंड्यांशी करत असून अभियंते होण्यासाठी ते जेवढी वर्षे अभ्यास करण्यात घालवितात त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे तिळवे म्हणाले. मुख्यमंत्री टॉयलेट बांधायची कामे गोवेकरांना देत आहेत आणि रुंद आणि सपाट रस्ते आणि इतर सगळ्या सुविधा अदानींसारख्या लोकांना देत आहेत. पूर्णपणे कंगाल बनलेले मुख्यमंत्री गोव्याला महामारीनंतरच्या काळासाठी तयार किंवा सक्षम बनविण्याच्या दृष्टीने काही पाऊले तर उचलत नाहीत, पण त्या दृष्टीने विचारही करताना दिसत नाहीत.

‘त्यांनी’ खाणी संपविला, हे पर्यटन संपवतील!

लॉकडाउनचा परिणाम म्हणून पर्यटन उद्योग अक्षरशः झोपलेला आहे आणि प्रवासावर तर बंदीच आहे. मनोहर पर्रीकर यांच्यामुळे खाण व्यवसाय काही वर्षांपूर्वी गुंडाळला गेला आणि आता डॉ. प्रमोद सावंत यांच्यामुळे पर्यटन व्यवसायही मरणासन्न अवस्थेत असून गटांगळ्या खात आहे, असा टोला तिळवे यांनी हाणला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!