म्हादईवरुन ‘आप’चा गोवा सरकारला अल्टिमेटम

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कर्नाटकात, गोव्यात आणि केंद्रात देखील भाजपचं सरकार आहे. तरीही म्हादईचं पाणी वळविण्यात आलय. म्हादई आमची आई आहे. गोव्यासाठी म्हादई नदी शेती आणि समृद्ध जैवविविधतेचा स्त्रोत आहे. भाजपनं ज्या प्रकारे आपल्या आईचा अपमान केला आहे, ते आपण पाहिलंच आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही आणि त्या विरोधात नक्कीच आवाज उठवू, असा इशारा आमी आदमी पार्टी गोवाचे राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) यांनी दिला.
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्या वागण्यामुळे संपूर्ण गोवा अचंबित झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीत सामान्यत: राज्यातील नागरिकांना केंद्र आणि राज्यातील काही महत्वाच्या पर्यावरणविषयक निर्णयाबद्दल थोडी स्पष्टता मिळण्याची संधी असते. पण पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केले की त्यांना गोमंतकीयांची काळजी नाही. जावडेकर यांनी या विषयी कोणतीही चर्चा करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यांच्या वागण्यामुळे असं दिसून येतं की, ते गोव्यात त्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची मजा लुटायला आले होते.
जावडेकर यांनी शेतकऱ्यांशी नव्या कृषी कायद्याबद्दला चर्चा का नाही केली? हा कायदा खरंच त्यांच्या हिताचा आहे का, हे का नाही विचारलं? पाण्याच्या प्रवाहात फेरफार केल्यास म्हादई नदीत खारटपणा वाढेल आणि यामुळे पर्यावरणाची नासधूस होईल.
संपूर्ण राज्यात कोकण रेल्वेचं डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाहतुकीसारख्या पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा चालू असताना एखाद्या केंद्रीय मंत्र्याने आपल्या कार्यक्षेत्रातील या विषयांकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का?
गोव्याला या आठवड्यात खूप प्रतिष्ठित ”पर्यटकाचे” पाय लागले. मी ”पर्यटक” म्हणालो, कारण कोणतीही जबाबदार व्यक्ती आणि त्यातून केंद्रीय मंत्री राज्यात येऊन त्यांच्या खात्याविषयी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी टाळाटाळ करणार नाहीत” असे राहुल म्हाम्ब्रे म्हणाले. “एक पर्यटक म्हणून गोव्यात त्यांचे आम्ही कायम स्वागतच करू, परंतु प्रथम त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची नितांत गरज आहे” असेही म्हाम्ब्रे म्हणाले.