‘आप’चं सरकार आलं, तर गोमंतकीयांना 200 युनिटपर्यंत वीज मोफत!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : वीजमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांच्याशी जाहीर वादविवाद करण्यासाठी आलेले दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष तथा आपचे आमदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी गोमंतकीयांना दिल्ली वीज मॉडेलच्या धर्तीवर सवलत देण्याची घोषणा केली. गोव्यात आपचं सरकार आलं, तर 200 युनिटपर्यंतची वीज मोफत दिली जाईल. तसेच उर्वरित ग्राहकांपैकी 20 टक्के ग्राहकांना वीज बिलात 50 टक्के सवलत देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
नीलेश काब्राल यांनी प्रतिसाद न देता वादविवादातून माघार घेतल्यामुळे राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेउन गोवा सरकारवर टीकेची झोड उठवली. दिल्ली सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणे प्रत्येक नागरिकामागे 30 हजार रुपये खर्च करण्याची मुभा सरकारला आहे. त्याचा वापर करून आम्ही सर्वांना पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या सुविधा मोफत देतो. महिलांना सार्वजनिक वाहतूक मोफत उपलब्ध आहे. मात्रगोवा सरकारच्या बजेटनुसार प्रत्येक नागरिकामागे 1 लाख 30 हजार रुपये खर्च करणं शक्य असताना सर्वच गोष्टी नागरिकांना विकत घ्याव्या लागतात. मग हा पैसा जातो कुठे? कोण हा पैसा गिळंकृत करतं, असा सवाल चढ्ढा यांनी विचारला.
…तर 93 टक्के लोकांना वीज बिलात सवलत
येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपचं सरकार गोव्यात आलं, तर 73 टक्के गोमंतकीय वीज ग्राहकांना जे 200 युनिटपर्यंत वीज वापरतात, त्यांना मोफत वीज दिली जाईल. उर्वरित 20 टक्के ग्राहकांना वीज बिलात 50 टक्के सवलत मिळणार. एकूण 93 टक्के वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळेल, अशी घोषणा चढ्ढा यांनी केली.