‘आप’चे ऑक्सिमित्र अभियान

ऑक्सिमीटरची कमतरता दूर करण्यासाठी एक प्रयत्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आम आदमी पार्टीने #GoansAgainstCorona या मोहिमेला बळकट करण्यासाठी ऑक्सिमीटर यंत्र नसलेल्या गृहविलगीकरणातील कोरोना रूग्णांना ऑक्सिमीटर प्रदान करून ऑक्सिमित्र या अभियानाद्वारे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहे. राज्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी आवश्यक असलेले ऑक्सिमीटर सारखी साधने त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याकारणाने त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं. यासंदर्भात राज्यांतील जनतेने आपशी संपर्क साधला. व ही भीती  दूर करण्यासाठी आम आदमी पार्टीने ऑक्सिमित्र अभियानाद्वारे त्यांना थेट घरपोच ऑक्सिमीटर प्रदान करण्याचं ठरवलं.

हेही वाचाः कोविड पॉझिटिव्ह गरोदर महिलेचं यशस्वी सी-सेक्शन

‘आप’चे ऑक्सिमित्र अभियान

आपच्या डॉ.विभास प्रभुदेसाई यांनी लक्ष वेधलं की, गोव्यातील वाढत्या कोरोना रूग्णांमुळे तसंच वाढत्या गृहविलगीकरणामुळे शासकीय आरोग्य केंद्रांकडे गृहविलगीकरणासाठीचे अत्यंत महत्त्वाचं आरोग्य किट संपत आहे. दररोज हजारो नवीन कोरोना रुग्णांमध्ये भर पडत असताना प्रभुदेसाई यांनी सांगितलं की, फार्मसी आणि मेडिकल स्टोअरमध्येही ऑक्सिमीटरचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. गेल्या वर्षी गोव्यातील पहिल्या लाटेच्या वेळी सरकार प्रत्येक कोरोना बाधित व्यक्तीला सरकारी कोविड केंद्रात भरती करीत होती. परिणामी, अपुर्‍या क्षमतेमुळे अनागोंदी निर्माण झाली होती, ज्यामुळे कोरोना बाधित रूग्ण घरात किंवा तातडीने ग्रामीण स्तरातील केंद्रामध्ये कोणत्याही देखरेखीशिवाय किंवा उपचाराशिवाय अडकले होते. या गंभीर वेळी ‘आप’ने गोव्यात गृहविलगीकरण अंमलात आणण्यासाठी सरकारला यशस्वीरित्या विश्वास दिला व गृहविलगीकरणाची मागणी मान्य करवून घेतली. तर शेकडो अशा रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सीमीटर उपकरण देऊन सहकार्य केलं.

हेही वाचाः आरोग्य संचालनालयाकडून महत्त्वाचं पाऊल

आयएमए गोवा चॅप्टरकडून ‘आप’च्या कार्याची प्रशंसा

गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या #GoansAgainstCorona मोहिमेला केवळ गोंयकार नव्हे, तर डॉक्टर्स, आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगलं सहकार्य केलं व ‘आप’ने केलेल्या कार्याचं कौतुक केलं. डॉ. प्रभुदेसाई यांनी आठवण करून दिली की, इंडियन मेडिकल असोसिएशनने (गोवा चॅप्टर) सार्वजनिकरित्या आपल्या पत्रकार परिषदेत ‘आप’च्या या कार्याची प्रशंसा केली असल्याचं डॉ. प्रभुदेसाई म्हणाले

हेही वाचाः CORONA UPDATE | पर्वरीत कोरोनाचा हाहाकार

आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून ‘आप’च्या योगदानाचे कौतुक नाही

आरोग्यमंत्री श्री. राणे आणि मुख्यमंत्री श्री. सावंत यांनी मात्र ‘आप’च्या या योगदानाचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी मात्र आपल्या छोट्या मनोवृत्तीचं दर्शन दाखवत क्षुल्लक राजकीय भाष्य केलं. कदाचित ‘आप’ची वाढती लोकप्रियता त्यांना बघवत नसावी, अशी टीका म्हांबरेंनी केली. राणे म्हणाले होते की, कोरोनाचं वादळ संपल्यानंतरच आप मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र दांभिकतेचं उदाहरण म्हणजे त्याच पत्रकार परिषदेत त्यांना हे मान्य करावं लागलं की कम्युनिटी ट्रान्समिशनमुळे गोव्यात दररोज एक हजारांवर रुग्ण वाढू शकतात, असा टोला म्हांबरेंनी लगावला.  राणेंनी आणि सावंत यांनी मात्र अतिमहागडं कोरोना किटवर स्वतःचे फोटो लावून फोटोबाजी करण्यात एक महिना वाया घालवला, मात्र त्या गंभीर काळात ‘आप’ने गोयंकरांच्या गरजा भागवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,” असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः CORONA |भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय

म्हांबरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

संपूर्ण गोवा कोव्हिडच्या या संकटाकडे अतिशय जबाबदारीने पाहत आहे. तेव्हा म्हांबरे यांनी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा आवाहन केलं की आपण आपलं क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवून इतर राजकीय पक्ष, संघटना, कॉर्पोरेट्स, स्वयंसेवी संस्था यांना आवाहन करून त्यांचा पाठिंबा, सहकार्य मोठ्या मनाने स्वीकारावं.

हेही वाचाः COVID VACCINATION | डिचोलीत ९ सेंटर लसीकरणासाठी

शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमीटर महत्त्वाचा

ऑक्सिमीटर हे कोविड दरम्यान एखाद्याच्या फुफ्फुसाच्या कार्याचा मागोवा घेण्याचं एक अमूल्य साधन आहे. शरीरातील ऑक्सिजन (प्राणवायू) ची पातळी कमी होणं म्हणजे रुग्ण गंभीर होत चाललाय, याची आगाऊ सूचना होय. अशावेळी त्वरित रुग्णाला पुढील उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो, असं डॉ. प्रभुदेसाई म्हणाले. तसंच सर्व कोरोना रूग्णांनी घरातूनच  डॉक्टरांच्या संपर्कात रहावं व सर्व सूचना पाळव्यात असं आवाहनही डॉ. प्रभुदेसाईंनी केलं.

हेही वाचाः भारतीयांना अमेरिकेत जाणं झालं अवघड; व्हाईट हाऊसने घेतला मोठा निर्णय

‘आप’ चे ऑक्सिमित्र रूग्णांपर्यंत पोहोचतील

कोविड बाधित रुग्णांना ऑक्सिमीटर मिळत नसल्यास त्यांनी घाबरून जाऊ नये. आपल्याला ऑक्सिमीटर उपलब्ध होण्याच्या विनंतीसाठी https://forms.gle/G7rTkjUKEFSm498W7 या लिंकवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी. लवकरच ‘आप’ चे ऑक्सिमित्र रूग्णांपर्यंत पोहोचतील असं आश्वासन म्हांबरे यांनी दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!