रायबंदरच्या आरोग्य केंद्राचं काय झालं?

आम आदमी पक्षाचा सरकारला सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रायबंदर येथे सर्व सुविधांनी युक्त वैद्यकीय केंद्राचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ. विभास प्रभुदेसाई म्हणाले की, सध्याच्या महामारीच्या काळात केवळ लोकांनाच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील नोकरवर्गालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळामध्ये सरकारचे प्राधान्य गोवेकरांचे आरोग्य हेच असले पाहिजे. पण सरकारला या विषयी काडीचाही रस नाही, असेच एकंदर परिस्थिती पाहून वाटते. गोव्यातील आरोग्यप्रणाली अथवा व्यवस्था ही स्वतःच निरोगी नाही.

डॉ. प्रभुदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी लोकांना रायबंदर येथे संपूर्ण सुसज्ज असे वैद्यकीय केंद्र उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर पुढे काय झाले हे कोणालाही माहिती नाही. या विषयामध्ये यासंबंधी स्थापन केलेल्या कोअर कमिटीलाही विश्वासात घेण्यात आले नाही. रायबंदर येथील या होऊ घातलेल्या केंद्राचे काम दिवाळीपूर्वी तरी सुरू करावे. जेणेकरून गोमंतकीय जनतेला सणासुदीच्या निमित्ताने एक भेट दिल्यासारखी होईल, असे डॉ. प्रभुदेसाई यांनी सांगितले.
यावेळी गोवा इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेचा मुद्दाही डॉ. प्रभुदेसाई यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, पूर्वी जिथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय होते, तिथे नंतर गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्यात आले. आता ही संस्था दुसरीकडे हलविण्यात आल्याने या इमारती सध्या वापरात नाहीत. शिवाय नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकार्‍यांनी सांगितले होते की, आवारामध्ये मोठी डागडुजीची कामे म्हणजे फ्लोरिंग, प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिकल फिटिंग अशी कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. सत्ताधारी भाजपकडे आमदार विकत घेण्यासाठी पैसे आहेत, राज भवनचे नूतनीकरण करण्यासाठी निधी आहे. पण लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी निधी नाही, हे दुर्दैवी म्हणावे लागेल.

रायबंदर येथील लोकांना गेली दोन दशके याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत आणि त्यांना एक तर पणजी येथे किंवा चिंबल येथे आरोग्य सुविधा घेण्यासाठी जावे लागते, असे डॉ. प्रभुदेसाई म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!