‘आप’मुळेच सरकारला जाग!

राहुल म्हांबरे : फक्त घोषणा, कार्यवाही नाहीच; विश्वजीत राणे यांच्या विधानाचा निषेध

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : एका बाजूला ते दिल्ली मॉडेलवर टीका करीत आहेत, तर दुसर्‍या बाजूने आम आदमी पक्षाच्या मोहिमेचा परिणाम म्हणून घरी क्वारनटाईन केलेल्या रुग्णांना आता थर्मोमीटर, ऑक्सिमीटर आणि मास्क सरकारकडून पुरवण्याची घोषणा करत आहेत. हे फार उशिरा झाले असले तरीही आम्ही त्याचे स्वागत करतो. पक्ष आणि इतर मतभेद बाजूला ठेवून आम्ही सर्वांनी करोना महामारीवर मात करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत आम आदमी पक्षाचे राहुल म्हांबरे (Rahul Mhambrey) यांनी व्यक्त केले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी केलेल्या ‘वादळ संपून गेले’या विधानाचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला असून अजून वादळ शमले नसल्याचे प्रत्युत्तर आरोग्यमंत्र्यांना दिले आहे. आम आदमी पक्षाने गोवन्स अगेन्स्ट करोना हा करोनाविरोधी उपक्रम सुरू केल्यानंतर चिडलेल्या आरोग्यमंत्र्यांनी या उपक्रमावर निशाणा साधताना, ‘वादळ संपल्यावर काही लोक तुमच्याकडे येतात, आणि म्हणतात, की आम्ही तुम्हाला मदत करतो.’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी असे विधान करणे हे धक्कादायक असल्याचे मत गोवन्स अगेन्स्ट करोना या मोहिमेचे प्रमुख राहुल म्हांबरे यांनी व्यक्त केले.

वादळ अजून शमले नाही : म्हांबरे
आरोग्यमंत्र्यांनी एवढे लक्षात ठेवावे की वादळ अजून शमलेले नाही, तर सध्याची परिस्थिती म्हणजे हिमनगाचे केवळ टोक आहे. रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असताना वादळ शमलेले आहे असे कसे काय म्हणता येईल? रुग्णांना कुठेही राज्यात खाटा मिळत नाहीत, वादळ संपले आहे का? कोविड रुग्ण गोमेकॉमध्ये जमिनीवर पडून आहेत, वादळ संपले आहे का? सर्वसामान्य गोवेकर आपल्या घरातून बाहेर पडायला आज घाबरत आहेत. असे असतानाही तुम्ही वादळ संपले आहे, असे म्हणणार का, असा सवाल राहुल म्हांबरे यांनी आरोग्यमंत्र्यांना विचारला आहे.

राणे यांचा समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जनतेबद्दल हव्या असलेल्या सहानुभूतीचा अभाव, गोवेकरांचे जीव धोक्यात घालत आहे. वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येविषयी जनतेला दोष देण्याविषयी केलेल्या विधानानंतर हे दुसरे विधान त्यांनी आता केलेले आहे. यावरून हे सिद्ध होते की सध्याची महामारीची परिस्थिती हाताळणे आरोग्यमंत्र्यांच्या हाताबाहेर गेले आहे. राणे यांनी ’गोअन्स अगेन्स्ट करोना या मोहिमेवर केलेले भाष्य त्यांचा अहंकार दाखविणारे आहे. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून करोनाविरुद्धच्या या लढाईमध्ये सगळ्यांबरोबर मिळून काम करणे आवश्यक आहे. ही मोहीम फक्त आम आदमी पक्षाची मोहीम नसून संपूर्ण गोव्यातील जनतेची आहे ज्यांनी करोनाला हरविण्यासाठी एकत्र येऊन कंबर कसली आहे, असेही म्हांबरे पुढे म्हणाले.

दिल्लीत होते गोव्यात का नाही?
दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी नेहमीच म्हटले आहे की दिल्ली येथे करोनाविरुद्ध वापरलेल्या मॉडेलमध्ये प्रामुख्याने आपने भाजप, काँग्रेस या पक्षातील लोकांना एकत्र आणले तसेच केंद्र सरकार, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक संस्था यांनाही सामावून घेण्यात आले. ही एक जागतिक महामारी असून तिला तोंड देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एकत्र येऊन काम करणे. असे दिसत आहे की केंद्रामध्ये व गोव्यात भाजपचेच सरकार असताना केंद्र सरकारने गोव्याला महामारीला तोंड देण्यासाठी तसेच वार्‍यावर सोडले आहे, असेही म्हांबरे म्हणाले.
केंद्र सरकारकडून गोव्याला काही आधार न मिळण्यामागे काही कारण आहे का? की आरोग्यमंत्री राणे यांचा अहंकार केंद्राकडे मदतीची याचना करण्याच्या आड येतो आहे? एक काँग्रेस पक्षातला नेता पक्षांतर करून भाजपात येऊन आरोग्यमंत्री झाल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार गोव्याला मदत करायला तयार नाही का? आपल्या अहंकारामुळे राणे गोमंतकीय लोकांचे जीव कशाला घेत आहेत, असे सवालही म्हांबरे यांनी उपस्थित केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!