मायकल लोबो राजीनामा द्या : ‘आप’ची मागणी

मंत्री लोबो यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असं लोकायुक्त म्हणतात. या प्रकरणी कलम 420 अंतर्गत मायकल लोबोंविरुद्ध केस दाखल करणं आवश्यक आहे!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मावळते लोकायुक्त पी. के. मिश्रा (P. K. Mishra) यांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मंत्री मायकल लोबोंविरोधात (Michael Lobo) त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. लोबो यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आपचे प्रवक्ते सुरेल तिळवे (Surel Tilve) यांनी केली आहे.

एनजीपीडीएचे तत्कालीन अध्यक्ष मायकल लोबो यांच्या कार्यालयातून बांधकाम परवान्यास परवानगी देण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्याचे स्पष्ट निरीक्षण लोकायुक्तांनी नोंदविले. लोबो यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असं लोकायुक्त म्हणतात. हे बनावटपणाचं प्रकरण आहे. या प्रकरणी कलम 420 अंतर्गत मायकल लोबोंविरुद्ध केस दाखल करणं आवश्यक आहे, असं आपचे तिळवे म्हणाले.

असा मंत्री गोमंतकीयांसाठी अधिक धोकादायक!
एनजीपीडीए कार्यालयातून पंचायतीला सल्ला कोण देत होतं? लोकायुक्तांच्या निवाड्याचे तपशील पाहिले, तर लक्षात येईलकी, मायकल लोबो यांचा हेतू पूर्णपणे चुकीचा होता. लोबो मंत्री म्हणून कसे अयोग्य आहेत, हे त्यांनी दर्शविलं आहे. जर लोबो अशा प्रकारचा खोटारडेपणा आणि त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत असतील, तर पुढे ते गोमंतकीयांसाठी अधिक धोकादायक ठरतील, असं तिळवे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांचा निवाडा वाचून समजावण्यास आम्ही तयार आहोत. लोकायुक्तांनी नोंदविलेली निरीक्षणे गंभीर आहेत. बनावटपणा करणं ही एक मोठी फसवणूक आहेआणि या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे मौन शंकास्पद आहे, असं तिळवे म्हणाले.

भ्रष्टाचाराचं संरक्षण करणं कधी थांबवणार?
तिळवे म्हणाले, मी मुख्यमंत्री सावंत यांना विचारू इच्छितो की, तुम्ही भ्रष्टाचाराचं संरक्षण करणं कधी थांबवणार आहात? आपणास कारवाई करण्यापासून कोण थांबवत आहे? गोमंतकीयांच्या आशा आता मावळत चालल्या आहेत. त्यामुळं तुम्ही आता काही तरी ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात मायकल लोबोंविरोधातील कारवाईनं करावी.

फक्त देवच गोव्याला वाचवू शकतो!
आम आदमी पार्टी लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्या धैर्य आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करते. सरकारने योग्य पद्धतीने त्यांना निरोपदेखील दिला नाही. ही आमच्यासाठी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी अचूकपणे सांगितलं आहे की, ज्या प्रकारे हे सरकार भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देतं, ते पाहता ‘फक्त देवच गोव्याला वाचवू शकतो’, असं तिळवे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!