करोना योद्ध्यांनाही आता सरकार माघारी पाठवणार का?

'आप"चा सरकारला आणखी एक रोखठोक प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पहिल्या रांगेतील योद्धे असलेल्या डॉक्टरांनाही सरकारने सोडलेले नाही. यावरून आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोविड 19 च्या विरोधात सेवा देणाऱ्या मडगाव येथील इएसआय हॉस्पिटल आणि दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना देण्यात येणारी निवासाची सोय मागे घेण्याचा अथवा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ. विभास प्रभुदेसाई यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

कोविड 19 महामारी सरकारने ज्या निष्काळजी व कामचुकारपणे हाताळली त्या मुद्द्याला हात घालून सरकारला लक्ष्य करताना आता आम आदमी पक्षाने म्हटले आहे की. वाढत चाललेल्या या महामारीला रोखण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या डॉक्टरांचेही मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने चालविलेला आहे. मडगावात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना तिथली जागा 24 तासांच्या आत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्यांना कुठलीही पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, हे अन्यायकारक आहे असे डॉ. विभास यांचे म्हणणे आहे.

सरकार असंवेदनशील!

“डॉक्टरांना अशा कठीण प्रसंगी सध्या राहत असलेल्या निवासस्थानाचे भाडे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून भरायला लावणे हे सरकारच्या नाकर्तेपणाचेच लक्षण आहे, असे डॉ. विभास प्रभूदेसाई यांनी म्हटले आहे. यावेळी प्रभुदेसाई यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले की, तिथले डॉक्टर हे जीवाचे रान करून 24 तास तहान भूक विसरून कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवेच्या माध्यमाने आराम व दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या जीवाला धोका असतानाही हा धोका पत्करून डॉक्टर कार्यरत असताना त्यांना स्वतःच्या पगारातूनच भाडे भरायला लावणे यावरून सरकार हे किती असंवेदनशील आहे, असा प्रश्न येतो, असे प्रभुदेसाई म्हणाले.

“आपल्या हॉस्पिटलपासून गोमेकॉपर्यंतचा एक तासाचा प्रवास आपली ड्युटी संपवून करण्याचा प्रकार डॉक्टरांना थकविणारा होऊ शकतो. ज्याचा परिणाम डॉक्टरांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. सरकारने हे लक्षात ठेवावे, की डॉक्टर हेही माणसेच असतात, यंत्रे वा मशीन्स नाहीत,” असे म्हणताना त्यांनी या मुद्द्यांची आठवण करून दिली काही डॉक्टर अशी संवेदनशील विभाग हाताळतात ज्यामध्ये 24 तास लक्ष्य द्यावे लागते. हे डॉक्टर बांबोळी येथे सेवा कशी देऊ शकतील? असा प्रश्न डॉ. विभास यांनी सरकारला विचारला आहे.

डॉ विभास पुढे म्हणतात की सरकारने या विषयी कुठलाही अधिकृत आदेश जारी केलेला नाही. पण सर्व डॉक्टरांना हे आदेश फक्त तोंडी सांगण्यात आलेले आहेत. या प्रकाराला प्रभुदेसाई यांनी भाजप सरकारकडून आपल्या लोकांना धमकावण्याचा वा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना उद्द्युक्त करण्याचा आणखीन एक प्रकार वा उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

प्रभुदेसाई म्हणाले की, या अमानुष आणि अलोकशाही पद्धतीच्या दृष्टिकोनातून सरकार पुढे गेल्यास आम आदमी पक्ष डॉक्टरांच्या बाजूने उभा असेल. महामारीशी दोन हात करण्यासाठी सरकारने काही ठोस उपाययोजना घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी डॉक्टरांच्या प्रति काही संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे कारण मुख्यमंत्री हे स्वतः एक डॉक्टर आहेत आणि वैद्यकीय सेवा पेशात कार्यरत आहेत, असे डॉ. प्रभुदेसाई यांनी नमूद केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!