कोळसा संकटास काँग्रेस-भाजप जबाबदार!

आपची प्रखर टीका : दोन्ही पक्ष संधीसाधू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गोवा आणि गोवेकरांच्या जीवावर आपापल्या पक्षाचे इप्सित साध्य केले. लोकांच्या सध्या सुरू असलेल्या चळवळीला काँग्रेसने दिलेला पाठिंबा म्हणजे काँग्रेसचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न व संधीसाधूपणा असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

“आप”चे नेते लॉरेन्सो डिसिल्वा म्हणाले की, अदानी यांना मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी ) येथे बर्थ वाढविण्याची परवानगी काँग्रेस पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असताना मिळाली होती. स्व. मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत या विषयी बोलताना 9 नोव्हेंबर रोजी लिहिलेले एक पत्रही वाचून दाखविलेले होते आणि हे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून लिहिण्यात आले होते. या पत्रामध्ये दिगंबर कामत यांनी असे म्हटले होते की अदानी यांनी एमपीटीबरोबर एक करार केला असून याचे काम मे 2010 मध्ये सुरू झाले तर मार्च 2014 मध्ये पूर्ण झाले आणि काँग्रेस सरकारने काम सुरू करण्याला मान्यता दिली तर भाजपने काम पूर्ण करण्यास परवानगी दिली.

…नंतरच चळवळीत सहभागी व्हा!

काँग्रेसने आधी गोव्याच्या जनतेला आधी याचे स्पष्टीकरण द्यावे एमपीटीमध्ये बर्थ विकसित करण्याच्या सर्व परवानग्या अदानी यांना कशा आणि का देण्यात आल्या? हा कोळसा ऑस्ट्रेलियामधून आणण्यात आला होता. काँग्रेसने आधी या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतर गोव्याला कोळशाचे केंद्र बनविण्याच्या सरकारच्या प्रयत्नाविरोधात उभ्या राहिलेल्या लोक चळवळीमध्ये सामील व्हावे, असे डिसिल्वा म्हणाले.

काँग्रेसकडून लोकांची फसवणूक!

काँग्रेसने लोकांना फसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काँग्रेस आपण कोळशाच्या विरोधात आहे असे जे म्हणते आहे ते खोटे असून वास्तविकपणे काँग्रेसने गोव्यात कोळसा आणला असेच नाही तर तो विस्तारित आणि विकसित करण्यासाठीही पाऊले उचलली. अदानीच्या या कारस्थानात काँग्रेसचा वाटा तेवढाच आहे व काँग्रेसही बरीच गुंतलेली आहे. निवडणुकीनंतर त्यांचे आमदार भाजपमध्येही जाण्याची शक्यता आहे, असा इशारा लॉरेन्सो यांनी दिला.

विरोध केलेले प्रकल्पच उचलून धरले!

सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पूर्वी विरोधीपक्ष म्हणून काम करताना ज्या प्रकल्पांना विरोध केला त्याच प्रकल्पांना पुढे दामटणे सुरू केले आणि त्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित प्रोमोटर्सना मदत करण्यास सुरुवात केली. एक सर्वात मोठा विरोधाभास असा म्हणता येईल की ज्या स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी विरोधीपक्ष नेतेपदी असताना रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण कोळसा वाहतुकीसाठी असल्याचा आरोप करून आक्षेप घेत प्रकल्पाला विरोध केला होता, त्याच प्रकल्पाविषयी त्यांनी संपूर्ण ‘यू टर्न’ घेत मुख्यमंत्री झाल्यावर प्रकल्पाला प्रोत्साहन दिले, असे लॉरेन्सो म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!