स्थानिक मुद्द्यांवर गोमंतकीयांशी चर्चा का नाही?

आम आदमी पक्षाचा सरकारला प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सनबर्न महोत्सवाला मान्यता देण्यात आली आणि आता ते रद्द करण्यात आले आहे. यावरून सरकार दरबारी किती गोंधळ सुरू आहे हे दिसून येते, अशी टीका आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी केली. प्रशासकीय गोंधळाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. भाजप सरकार लोकांशी कुठल्याही विषयावर चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे आता त्यांना शेवटच्या क्षणी सनबर्न महोत्सव रद्द करणे भाग पडले आहे, असे तिळवे म्हणाले.

सनबर्न कोविड विषाणूचा बॉम्ब विस्फोट ठरू शकला असता. कारण या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने लोक हजेरी लावणार होते. दरवर्षी सरकार स्वतःचे डावपेच खेळते आणि महोत्सवाला देण्यात येणारी परवानगी शेवटच्या क्षणापर्यंत अधांतरी लटकून ठेवते. कारण त्यांना त्यातून मिळणार्‍या कमिशनचा वाटा जास्त वाढवायचा असतो. कोविड रुग्णांसाठी खाटाची व्यवस्था दिवसेंदिवस कमी पडत असताना सरकार सनबर्न महोत्सवासाठी परवानगी देते, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतील आणि अर्थातच सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला पायदळी तुडवले जाणारच, असे तिळवे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा आपल्या इतर मंत्र्यांवर काहीही ताबा राहिलेला नाही. सरकार स्थानिक लोकांशी वा जनतेशी कुठल्याही विषयावर चर्चा न करता काहीही करीत सुटले आहे. लोकांच्या विरुद्ध असलेले प्रकल्प सरकार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मुळात सरकारने सनबर्न महोत्सव जनतेच्या दबावामुळे रद्द केला, असे तिळवे म्हणाले. गोव्याच्या जनतेशी यापुढे कुठल्याही विषयावर चर्चा व सल्ला मसलत करूनच निर्णय घेतला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!