हा तर रिकामटेकडा! हेविवेट आमदाराला आपचे प्रत्युत्तर

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजीः आम आदमी पक्ष (AAP) लोकांना ऑक्सिमीटर वाटत आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे. ऑक्सिमीटरचा तसा काहीच उपयोग नाही. ऑक्सिमीटर फक्त ऑक्सिजनचं प्रमाण दाखवतं. पण जर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर पुढे काय? आम आदमी पक्षाला गोवेकरांचं सोयरसुतक असेल तर त्यांना व्हँटिलेटर पुरवावे. व्हँटिलेटरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. निवडणूक तोंडासमोर ठेवून नाटक करू नये, असा सल्ला बाणावलीचे राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमांव (Churchill Alemao) यांनी आम आदमी पक्षाला दिला.
आम्ही लोकांना गोळ्यांचं वाटप केलं. या गोळ्यांमुळं प्रतिकार शक्ती वाढते. आज अमेरिका (America)आणि इतर प्रगत राष्ट्रांना कोविड 19 महामारीवर मात करण्यात अपयश आलं आहे. गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी कोविड 19 ची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली आहे. तरी अजून सुधारणा करण्याची गरज आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी राज्यात व्हँटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा वाढवावा, अशी मागणी चर्चिल यांनी केली.
बेकार बसलेल्या रिकामटेकड्या आमदारांना आता आमच्या गोवन्स अगेन्स्ट कोरोना मोहिमेमुळे भीती वाटत आहे, असुरक्षित वाटत आहे. एकतर गोव्यातील जनतेला मदत करा अथवा आमच्या मार्गातून दूर व्हा
राहुल म्हांबरे, आम आमदी पक्षाचे निमंत्रक
चर्चिलच्या टिकेला ‘हे’ आपचे प्रत्युत्तर…
‘आप’ वर पुन्हा एकदा एका रिकामटेकड्या आमदारानं हल्ला चढविला आहे. जे काम त्यानं आणि त्याच्या सरकारनं करायला पाहिजे होतं, ते मात्र ते करीत नाहीत. चर्चिल आलेमाव यांचं विधान जेवढं चुकीचं व धोकादायक आहे, तेवढंच हास्यास्पद आहे. ऑक्सिमीटर हे कोरोनाच्या विरोधात लढण्याचे एक प्रभावी शस्त्र असल्याचं जागतिक स्तरावर सिद्ध झालंय. आम्ही या मुद्द्याची दखल घेऊन हे सांगू इच्छितो की या आजाराशी लढणाऱ्या लोकांना मदत करणं आलेमाव यांना जमत नसेलही, पण निदान ज्यांना मदत कशी करावी हे माहीत आहे, निदान त्यांना तरी मदत करण्यापासून त्यांनी अडवू नये.
आपचे चर्चिल यांना सवाल
- गोव्यातील कोरोना रुग्णांसाठी तुम्ही काय केलं?
- गोवा सरकार चांगली सुविधा देण्यात अपयशी ठरलं तेव्हा आपण आमदार या नात्याने कितीवेळा सरकारला धारेवर धरून प्रश्न केले?
- गोमेकॉच्या जमिनीवर लोकांना झोपणं भाग पडलं होतं तेव्हा आपण कुठे होता?
- गोव्यात कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत जाणाऱ्या आकड्यांविषयी आपलं मत काय आहे?
- आपल्या बाणावली मतदारसंघातील मतदारांना वाचविण्यासाठी आपण आतापर्यंत काय केलं?