अदानींच्या स्वार्थासाठी गोव्याला का विकलं? आपचा मुख्यमंत्री सावंतांना प्रश्न

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्र्यांना 5 प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आपचे प्रवक्ते आणि नेते ऍडव्होकेट सुरेल तिळवेंनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना 5 प्रश्न विचारले आहे. पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली होती. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड केली. या घटनेचा आपने निषेध केलाय. तसंच मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधलाय.

आम आदमी पक्षाचे ऍड. सुरेल तिळवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर 5 प्रश्न उपस्थित केलेत. गोवेकरांच्यावतीने हे प्रश्न सावंत यांना विचारताना या प्रश्नांची उत्तरे सावंत यांनी गोव्यातील जनतेला द्यावीत, असं आवाहन तिळवे यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय.

ऍड. सुरेल तिळवे म्हणतात…

कालची निदर्शने हा केवळ ट्रेलर होता. आमची चळवळ अजून वाढत जाणार असून काहीही झाले, तरीही “आप”चे स्वयंसेवक म्हणून आमच्या हक्कांसाठी आम्ही कुठल्याही दिशेने प्रयत्न केल्याशिवाय सोडणार नाही. गोवा हा गोवेकरांसाठी आहे आणि आम्ही सरकारला याची निरंतर आठवण करून देत राहणार आहोत, जे सरकार फक्त अदानीच्या स्वार्थासाठी कार्यरत आहे.

तिळवे पुढे म्हणाले की,

आम आदमी पक्ष गोव्याच्या लोकांबरोबर सध्याच्या आव्हानात्मक काळामध्ये व कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभा राहणार आहे आणि यापुढेही खंबीरपणे गोवेकरांच्या पाठीशी उभा असेल. गोव्याचे नशीब हे केवळ गोवेकरांनीच निश्चित केले पाहिजे, एखाद्या अदानीने नव्हे किंवा दिल्लीत बसलेल्या भाजप नेत्यांनीही नव्हे. आम आदमी पक्ष मुख्यमंत्री सावंत यांना 5 प्रश्न विचारात आहे. सावंत साहेबांनी त्यांची उत्तरे गोव्याच्या जनतेला द्यावी लागतील.

आपने उपस्थित केलेला 5 सवाल


  • रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला अदानीसाठी (डबल ट्रॅक प्रोजेक्ट ) मान्यता देण्याआधी गोवेकरांना का विचारले नाही?

  • लोकांना असे वाटते आहे की या प्रकल्पामुळे गोवेकरांना काहीही फायदा होणार नाही. या प्रकल्पामुळे गोमंतकीय जनतेला होणारा एकतरी फायदा सांगावा, ही विनंती.

  • कोळसा वाहतुकीचे परिणाम सहन करण्यासाठी आपण स्वतः सहकुटुंब ट्रॅकच्या आवारात अथवा परिसरात राहायला तयार आहात काय?

  • गोवेकरांचे हित पायाखाली तुडवून त्यांचा जीव आणि आरोग्य धोक्यात घालून दिल्लीतील भाजप नेत्यांचे आदेश मानण्यात धन्यता का दाखविली? तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला गोवेकरांची पर्वा नाही, असे म्हणावे का?

  • अदानींबरोबर तुमचा काय संबंध आहे? भाजपचे अदानींबरोबर काय संबंध आहेत? गेल्या पाच वर्षात अदानींनी भाजपचा पक्ष आणि पक्षाच्या नेत्यांसाठी किती प्रमाणात अथवा काय देणग्या दिलेल्या आहेत?

मुख्यमंत्र्यांना आपचा इशारा

गोव्यातील लोकांनी यापूर्वीही इतिहासात अनेक लढे दिलेत. गोमंतकीय ओळख तसंच संस्कृती जपण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहुतीही दिलेली आहे. आम्ही गोवेकर हे सर्व वाया जाऊ देणार नाही. गोवा हा गोमंतकीयांसाठी आहे, अदानींसाठी नव्हे. काँग्रेस आणि भाजप पक्षांची सत्ता असताना गोव्यासाठीचे निर्णय दिल्लीमध्ये घेतले गेले जे गोवेकरांच्या इच्छेविरुद्ध होते. झाले ते खूप झाले. गोवेकर जनता यापुढे हे सहन करणार नाही, असं म्हणत आपने मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय.

गोव गोयकरांसाठीच, अदानींसाठी नव्हे!

गोव्यासाठी गोवेकरच निर्णय घेतील. गोव्याविषयीचे निर्णय हे आता दिल्लीमध्ये बसलेले भाजप किंवा काँग्रेसचे नेते घेणार नाहीत, तर गोव्याचीच जनता घेईल, असे ऍड. तिळवे यांनी शेवटी नमूद केले. आपने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता सत्ताधारी भाजपकडून तसंच मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सरकारची दडपशाही?

दडपशाहीने आम्ही घाबरून जाणारा नाही, असं आपचे राहुल म्हांबरे यांनी म्हटलंय. पोलिसांनी केलेली कारवाई, ही एकप्रकारची दडपशाही असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एक व्हिडीओ बनवून त्यांनी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा –

स्पेशल रिपोर्ट | आपचा सत्ताधारी भाजप सरकारवर हल्लाबोल

पंचनामा | होमलोनचे EMI वाढल्यानं सरकारी बाबू हवालदिल

कोविड सेंटरमध्ये ‘गुटर गुटर’, पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!