केरी मारामारी प्रकरणी एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल

आठ जणांना अटक; पाच जणांना जामीन

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः केरी येथील जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीच्या प्रकरणी वाळपई पोलिसांकडून  एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात इतरांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती वाळपई पोलिस सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. 

हेही वाचाः लोकायुक्तासमोरील दाव्यांच्या तक्रारदारांना आवाहन

चार दिवसांपूर्वी झाली होती मारामारी

चार दिवसांपूर्वी केरी भागात असलेल्या जमिनीच्या वादावरून दोन गटांमध्ये जबर मारामारी झाली. या संदर्भात  तक्रारी परस्पर गटाकडून करण्यात आल्या होत्या. गायत्री गोपाळ गावस यांनी परस्पर विरोधी गटातील 15 जणांवर, तर गुरुदास राजाराम गावस यांनी परस्पर विरोधी गटातील 7 जणांवर तक्रार दाखल केली होती.

हेही वाचाः विरोधकांनी टीकाच केली; आम्ही ‘टीका उत्सव’ केला

एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल

यासंदर्भात चौकशी करून एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धारदार शस्त्रांचा वापर करून मारामारी करणे अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गायत्री गोपाळ गवस यांच्या गटातील कृष्णा हरिचंद्र गावस, गोपाळ हरिचंद्र गावस आणि गायत्री गोपाळ गावस यांना, तर गुरुदास राजाराम गावस यांच्या गटातील श्याम लक्ष्‍मण गावस, प्रवीण हरिश्‍चंद्र गावस, बाबाजी मनोहर गवस, तन्मेश मनोहर गावस आणि अर्जुन शिवा गावस यांचा समावेश आहे. पैकी श्याम गावस, प्रवीण गावस, लक्ष्मण गावस, बाबाजी गावस, तन्मेश गावस आणि अर्जुन गावस यांना जामीन मंजूर झाला.

हेही वाचाः टिंटेड काचा हटवायला लावणारच; जुझे फिलीप डिसोझांच्या घोषणेचं स्वागत

दरम्यान एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गायत्री गोपाळ गावस यांच्या गटातील सात जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये कृष्णा हरिश्चंद्र गावस, वर्षा कृष्णा गावस, गोपाळ हरिचंद्र गावस, तारामती हरिचंद्र गावास, गंभीरा गुरुदास गावस, मनीषा उदय गावस; तर गुरुदास राजाराम गावस यांच्या गटातील एकूण पंधरा जणांचा यामध्ये समावेश आहेत, ज्यामध्ये गुरुदास गावस, लाडू लक्ष्मण गावस, गुरुप्रसाद लक्ष्मण गावस, श्याम लक्ष्मण गावस, अनिल विठो गावस, प्रवीण हरिश्चंद्र गावस, बाबाजी मनोहर गावस, सर्वेश मनोहर गावस, अर्जुन शिवा गावस, लता लाडू गावस, देवयानी गुरुदास गावस, नीलम अर्जुन गावस, मनीषा गावस आणि शर्मिला गावस यांचा समावेश आहे.

हेही वाचाः डिसेंबर 2021 पर्यंत पेडणे राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण

मारामारीचा व्हिडिओ वायरल

दरम्यान ज्यावेळी दोन्ही गटात मारामारीचा प्रकार घडला, त्यावेळी काहींनी याचा व्हिडिओ शूट केला होता. सदर व्हिडिओ सध्या सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वायरल होऊ लागला आहे. कोयता, दगड आणि लाठ्या घेऊन परस्परांना कशाप्रकारे मारहाण करण्यात येत आहे या संदर्भाचा हा व्हिडिओ असून यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या वादावरून मारामारी करणं याबाबतीत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, त्यात अनेकजण सरकारी नोकर असल्याचं उघडकीस आलंय. यामुळे येणाऱ्या काळात सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आरोग्यमंत्री ‘का’ नाहीत

महिला आयोगाकडे तक्रार जाण्याची शक्यता

दरम्यान ज्यापद्धतीने महिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर या संदर्भात या तक्रारी महिला आयोगाकडे करण्याची पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. तसं झाल्यास अनेकांसमोर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!