पर्तगाळी जीवोत्तम मठात सुरू झाले नवे पर्व

उत्तराधिकारी म्हणून विद्याधीशतीर्थ स्वामी मठाधीशपदी विराजमान

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण: प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठात शुक्रवारी २४व्या मठाधीशपदी श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज विराजमान झाले. पर्तगाळ-काणकोण येथील केंद्रीय मठात शुक्रवारी त्यांचा पीठारोहण सोहळा झाला. वृंदावनस्थ २३वे गुरुस्वामी श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामींचे २४वे उत्तराधिकारी म्हणून ते या गुरुपीठावर विराजमान झाल्याने नवीन पर्वाचा शुभारंभ झाला.

हेही वाचाः एकच पक्ष, एकच झेंडा, एकच विचार !

२४व्या मठाधिपतीपदावर विद्याधीशतीर्थ श्रीपाद् वडेर स्वामी महाराज विराजमान

२३ वे श्री गुरुस्वामी विद्याधिराज स्वामी सोमवार, १९ रोजी वृंदावनस्थ झाले होते. त्याच महान परंपरेतील २४व्या मठाधिपतीपदावर विद्याधीशतीर्थ श्रीपाद् वडेर स्वामी महाराज विराजमान झाले आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विद्याधीशतीर्थ स्वामी म्हणाले, विद्याधिराज स्वामींचे मार्गदर्शन शंभर वर्षं तरी लाभायला हवं होतं. विद्याधिराज स्वामींचं सात वर्षांचं सान्निध्य लाभलं. स्वामींची शिस्त यापुढे उपयोगी पडेल. स्वामींनी जे कार्य केलं तसंच कार्य करण्याचा आपण प्रयत्न करेन. ज्येष्ठांचं गुणगान केल्यानं मन शुद्ध होतं. आसनावर बसताना आनंद होत असतो. मात्र, ते आसन काटेरी असतं, असं गुरू स्वामी सांगत होते. आज जबाबदारी वाढली आहे. गुरू स्वामींनी शेकडो वर्षांपासूनची मठाची परंपरा सांभाळली आहे. गुरुस्वामींकडून मिळालेली अनुभवाची शिदोरी आपणास मठाचा कारभार चालवताना उपयोगी पडेल, असं त्यांनी सांगितलं. स्वामींचे जे संकल्प अपुरे राहिले आहेत ते पूर्ण करणार असं सांगून सर्वांचे भलं होवो, असा आशीर्वाद यावेळी स्वामींनी आशीर्वचन भाषणात दिला.

हेही वाचाः लोकशाहीचा मार्गदर्शक हरपला ; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

दरम्यान, शनिवार दि ३१ जुलै रोजी सायं. ५ वा. श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज व्यासपूजापूर्वक चातुर्मास व्रताचा स्वीकार करणार आहेत.

हेही वाचाः पर्तगाळ मठाधीश विद्याधिराज वडेर स्वामीजींचे महानिर्वाण

स्वामींचा परिचय

श्रीमद् विद्याधीशतीर्थ हे बेळगावी येथील वेदमूर्ती लक्ष्मीनारायण व पद्मावती भट यांचे द्वितीय पुत्र. त्यांचं पूर्वीचे नाव उदय भट शर्मा. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९९५ रोजी झाला. गोविंदराय सक्सेरिया या. पी.यू. महाविद्यालयातून त्यांनी पदवीपूर्व विज्ञान शाखेतील शिक्षण घेतलं असून मराठा मंडळ इंजिनियरिंग महाविद्यालयात ते मॅकनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होते. श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामींनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड केल्यानंतर त्यांना पर्तगाळी येथे संन्यासाश्रमाची दीक्षा देण्यात आली होती. कोकणी ही विद्याधीशतीर्थ स्वामींची मातृभाषा असून कन्नड, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा त्यांना अवगत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | SWAMI | पर्तगाळ मठाच्या आवारात विधीवत पार्थिव समाधीस्थ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!