कोविडबाधित महिलेचा इस्पितळाबाहेर गाडीतच मृत्यू

उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी 5 तास ताटकळत

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : बेताळभाटी येथील कोरोनाबाधित एका ४९ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सकाळी ६च्या दरम्यान दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात आणण्यात आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने अखेर त्या महिलेचा गाडीतच मृत्यू झाला. बेताळभाटी सरपंच कोस्तांसिओ मिरांडा यांनी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

बेताळभाटी येथील महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने त्या महिलेने मडगाव येथील एका खासगी इस्पितळात सोमवारी दुपारी १च्या सुमारास करोनाची चाचणी केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास त्या महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागताच तिच्या पतीने बेताळभाटी सरपंचांना फोन केल्यावर त्यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिलेला गाडीतून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी त्या महिलेच्या पतीने सर्वांना विनंती केली. मात्र, कुणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याने तपासणी केलेल्या इस्पितळाला कॉल करून अहवालाबाबत चौकशी केल्यानंतर महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.

काय आहे घटनाक्रम?

सकाळी ६ पासून ११ वाजेपर्यंत महिलेला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, ११ वाजता श्वास घेण्यात आणखी त्रास होऊ लागला व महिलेने गाडीतच मृत्यूला कवटाळले, अशी माहिती बेताळभाटी सरपंच कोस्तांसिओ मिरांडा यांनी दिली. मिरांडा म्हणाले, त्या महिलेला श्वास घेण्यात अडचण येत होती. इस्पितळात सकाळी ६ वा. नेण्यात येऊनही उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले नाही. त्याचवेळी उपचाराला सुरुवात केली असती तर त्या महिलेचा मृत्यू झाला नसता. आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिला घरी आणण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्याने जिल्हा इस्पितळात चौकशी केली तर इस्पितळाबाहेर मृत्यू झाल्याने त्यांनी असमर्थता दाखवली. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास आमदार विल्फ्रे‍ड डिसा यांना समस्या सांगितल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घरी पाठवून मृतदेह पाहून प्रमाणपत्र जारी केले व सायं. ६ वा. त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सरपंच कोस्तांसिओ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, आपणास याबाबत कल्पना नसल्याचे सांगण्यात आले. फॉरेन्सिक विभागाकडे चौकशी केली असता, अशा व्यक्तीला प्रमाणपत्र जारी केले नसून याबाबत माहिती नसल्याचेच सांगण्यात आले.

आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज : आमदार डिसा

बेताळभाटी येथील घटनेबाबत आमदार विल्फ्रेड डिसा यांनी सदर कुटुंबीयांना मृत्यू प्रमाणपत्रासाठी मदत केली. याबाबत आमदार डिसा यांना विचारणा केली असता, सध्याच्या करोना महामारीच्या कालावधीत लोकांना चांगल्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाबाहेर पाच तास राहून महिलेचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी आहे. इस्पितळाच्या इमारतीतील वरचे दोन रिक्त मजले आरोग्य सुविधांसाठी वापरणे गरजेचे असल्याचे मत आमदार डिसा यांनी व्यक्त केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!