हलगर्जीपणा! कोविड पॉझिटिव्ह असूनही पोहोचला फार्मासीत

गोवा-कर्नाटक सीमेवरील घटना; गोंयकारांनो, शहाणपण कधी येणार?

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः सरत्या दिवसांसोबत कोरोनाचं राज्यातील रुप आक्राळविक्राळ बनत चाललंय. रोज मृतांच्या संख्येत होणारी वाढ लक्षणीय आहे. कोरोना बाधित सापडण्याचं प्रमाण तर विचारता सोय नाही. पण एवढं सगळं असूनही गोंयकारांना मात्र अजूनही शहाणपण आलेलं दिसत नाही. गोंयकारांच्या हलगर्जीपणाने सर्व सीमा ओलांडल्यात, यावर शिक्कामोर्तब करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तो व्हिडिओ पाहून डोक्यावर हात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

हेही वाचाः कर्नाटकात लॉकडाऊन! उद्यापासून कडक निर्बंध लागू

कोविड रुग्ण पोहोचला फार्मासीत

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगला व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे गोवा-कर्नाटक सीमेवरील एका फार्मासीतला. या व्हिडिओत चक्क एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती फार्मासीत पोहोचलीये. कोविड पॉझिटिव्ह असूनही बाहेर फिरत असलेल्या या व्यक्तीला कोविड नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल फार्मासीतील मुलीने दटावलंय. तर त्यावरही व्यक्तीने निष्काळजीपणे उत्तर दिलंय. कोविड कसा पसरतो, तो पसरू नये म्हणून काय काळजी घ्यायची या साध्या साध्या गोष्टी माहीत असूनही काही माणसं ही अशी निष्काळजीपणे वागतायत. यातून गोंयकारांचा सुस्त स्वभाव आणि कोविडप्रति असलेला त्यांचा हलर्गीपणा दिसून येतोय.

गोंयकारांनो, शहाणपण कधी येणार?

23 एप्रिलला राज्यात झालेल्या 5 पालिकांच्या मतदानाची मतमोजणी 26 एप्रिलला पार पडली. यावेळीही मुरगावात गोंयकारांकडून कोविड नियमांना पायदळी तुडवण्यात आलं. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र गोंयकारांनी ते न जुमानता कोविड नियमांची होळी केली. गोंयकारांना शहाणपण कधी येणार हे देवच जाणे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!