करोनातील सहा महिन्यांत राज्यात ९,५६५ बालकांचा जन्म

कुटुंब नियोजनासाठी केंद्राकडून गोव्याला १.८१ लाख निरोध, ७,२६१ गर्भनिरोधक गोळ्या

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी: करोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर म्हणजेच मार्च ते सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ९,५६५ बालकाचा जन्म झाला. तर माता झालेल्या सहा महिलांचा मृत्यू झाला. या सहा महिन्यांत कुटुंब नियोजनासाठी केंद्राने गोव्याला सुमारे १.८१ लाख निरोध, ७,२६१ गर्भनिरोधक गोळ्या तसंच यासंदर्भातील इतर साहित्याचाही पुरवठा केला. माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे यांनी राज्यसभेतील अतारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

हेही वाचाः कामाची बातमी! 1 एप्रिलपासून तुमची इन हॅन्ड सॅलरी कमी येणार, कारण…

लॉकडाऊनमुळे निरोध साधनांची कमतरता

करोना प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने गोव्यासह संपूर्ण देशभरात मार्चपासून पुढील काही महिने लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांना अनेक दिवस घरीच रहावं लागलं. या काळात बहुतांशी सर्वच कंपन्या बंद होत्या. त्यामुळे कुटुंब नियोजनासाठी स्त्री पुरुषांकडून वापरल्या जाणाऱ्या साधनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासली होती. त्याचा फटका बसून गोव्यासह देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडण्याची तसंच असुरक्षित गर्भपातामुळे माता मृत्यूची भीतीही निर्माण झाली होती. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्च ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील ३७ राज्ये आ णि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे १६.८० कोटी निरोध वितरित करण्यात आले. त्यातील १,८१.६७३ निरोधचा गोव्याला पुरवठा करण्यात आला, असं उत्तरात म्हटलं आहे. निरोधसह चार टप्प्यातील ४८१ गर्भनिरोधक इंजेक्शन, ७.२६१ गर्भनिरोधक गोळ्या तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या १०१ गोळ्याही केंद्राने गोव्याला पुरवल्या होत्या. आरोग्य केंद्रांमार्फत ही साधनं गोमंतकीयांना पुरविण्यात आली. याबाबत १४ एप्रिल, २४ मे व २२ जुलै रोजी आरोग्य केंद्रांमार्फत जागृती करण्यात आली, असंही चोबे यांनी उत्तरात म्हटलं आहे.

हेही वाचाः ‘ओस्सय ओस्सय’ | गोवा शिगमोत्सवाची तारीख जाहीर

गर्भपाताच्या ४५१ घटना

मार्च ते सप्टेंबर या करोना काळात राज्यात १२,३८३ महिला गरोदर होत्या. ९.५६५ बालके जन्माला आली. याच काळात गर्भपाताच्या ४५१ घटना घडल्या, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे यांनी उत्तरातून दिली आहे. याच काळात राज्यातील विविध इस्पितळांत ८६८ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या. पण एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक मातांचा मृत्यू

मार्च ते सप्टेंबर या काळात प्रसुती झालेल्या गोव्यातील सहा, तर देशभरातील ११,२२९ मातांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १,८०४ मातांचा समावेश आहे. त्यानंतर मध्य प्रदेश १,२९६, महाराष्ट्र ८२७ आणि पश्चिम बंगाल ७०६ या राज्यांचा क्रमांक लागतो. दादरा – नगर हवेली, दमण आणि दीव तसंच लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांत मात्र एकाही मातेचा मृत्यू झाला नाही, असंही उत्तरात म्हटलं आहे.

हेही वाचाः रायबंदरच्या आरोग्य केंद्राचं काय झालं?

बालक जन्मात उत्तर प्रदेशची आघाडी

करोनातील सहा महिन्यांच्या काळात उत्तर प्रदेशात सर्वाधिक १६,३८,५८७ बालकांचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्र ९,८८,२९८, बिहार ९,३९,३७९, मध्य प्रदेश ७,७१,८९० व राजस्थान ७,१७,२५० या राज्याचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक गर्भपात महाराष्ट्रात

या सहा महिन्यांत महाराष्ट्रात सर्वाधिक ५४,५१० गर्भपाताच्या घटना घडल्या. त्यानंतर तामिळनाडू ४२,७५८, आसाम ३८,८०४, पश्चिम बगाल २१,१७९ व हरयाणा १६,९०४ या राज्याचा क्रमांक लागतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!