पहिल्या महिन्यात 942/- तर दुसऱ्या महिन्यात 4,413/-, वीजबिल पाहून ‘शॉक’च बसला!

तुम्हालाही अशाप्रकारे वाढीव वीजबिल आलंय का?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना अर्धे पगार मिळाले, तर दुसऱ्या बाजूने महागाईने डोकं वर काढलं. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने जगायचं तरी कसं, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणूस सरकारकडून दिलासा मिळेल अशी आशा करत असताना, सरकारच त्याची लूट करत असल्याचं उदाहरणांसहित स्पष्ट होतंय. राजधानीतील सांतिनेज या भागात राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबाला वीज विभागाकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी आणि भरमसाठ वीजबिलं पाठवली गेली आहेत.

प्रकरण काय?

सांतिनेझ भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने वीज बिलाच्या नावावर वीज विभागाने त्यांना लूटलं असल्याची तक्रार केलीये. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात त्यांना 942 रुपये वीज बिल आलं. आर्थिक अडचणीमुळे जुलै महिन्यात त्यांना हे बिल भरता आलं नाही. पुढे जून महिन्यात आलेलं बिल हे मे महिन्यातील बिलाच्या तुलनेत चौपट म्हणजे 4 हजार 413 होतं. बिलाचा एवढा मोठा आकडा पाहून या कुटुंबाने नजीकच्या वीज कार्यालयात चौकशीसाठी धाव घेतलीय. तिथे त्यांना हे बिल न भरता पुढचं बिल किती येतं ते पाहुया, असं सांगण्यात आलंय.

पुढे जुलै महिन्यातील बिलाचा आकडा पाहून या कुटुंबाला भोवळच आली. पुन्हा एकदा या महिन्यातील बिल चौपट वाढून आलं होतं. हे बिल घेऊन वीज कार्यालयात गेलं असता तिथे त्यांना उडवा उडवीची उत्तर मिळाली. तुम्ही वीज जास्त वापरता म्हणून तुम्हाला एवढं बिल आलंय असं त्यांना सांगण्यात आलं. या कुटुंबाने येथील प्रतिप्रश्न केले असता त्याला बिल भरण्यास सांगण्यात आलं. पुढे ऑगस्ट महिन्यातील बिल हे पुन्हा चौपट वाढून सुमारे 12 हजाराच्या घरात आल्यानंतर या कुंटुंबाने कर्ज काढून हे बिल भरलं.

दरम्यान आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कुटुंबाच्या घरात एसी नाही, पंखे चार आहे, टीव्ही फार लावत नाही, तरीही या कुटुंबाला एवढं भरमसाठ बिल भरावं लागलंय.

अनेक कुटुंबांवर वीज संकट

हे कुटुंब फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्यावर असं वीजसंकट ओढवलंय. कोरोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार –उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात 25 ते 50 टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना अशक्य होतंय. अशावेळी या कुटुंबीयांनी वाढीव बिलाचे पैसे भरायचे कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य गोंयकार माणूस विचारतोय.

दरम्यान, तुमच्या बाबतीही असं झालं असेल, तर याबाबतची माहिती तुम्ही गोवन वार्ता लाईव्हला द्या. [email protected] या ईमेल आयडीवर आम्हाला संपर्क करा. अचानकपणे तुम्हाला वीजबिल वाढवून दिल्याची तक्रार केल्यानंतर तुम्हाला आलेले अनुभव काय होते, हे तुम्ही आम्हाला लिहून पाठवा. गोवन वार्ता लाईव्ह यासंबंधीच्या प्रतिक्रियांना वाचा फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!