COVID VACCINATION | डिचोलीत ९ सेंटर लसीकरणासाठी

लसीकरण केंद्रांची नावं जाहीर; डिचोली मामलेदारांकडून लसीकरण केंद्रांची पहाणी

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोलीः कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जातेय. राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्षं वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होणार होती. पण राज्यात पुरेसा लसींचा साठा नसल्यानं ही लसीकरण मोहीम थोडी पुढे ढकलण्यात आलीये. मात्र लसींचा साठा राज्यात पोहोचताच वेळ न दवडता सामान्यांच्या लसीकरणाची सुरुवात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर राज्य लसीकरणासाठी सज्ज झालंय. डिचोली तालुक्यात लसीकरणाची पूर्ण तयारी करण्यात आली असून लसीकरण केंद्रांची नावं जाहीर करण्यात आलीत.

डिचोलीत ९ सेंटर लसीकरणासाठी

18 ते 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यात 9 लसीकरण केंद्र जाहीर करण्यात आलीत. राज्य सरकार आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत या लसीकरण केंद्रांची घोषणा करण्यात आलीये. या केंद्रांमध्ये साखळी शासकीय महाविद्यालय, वेळगे प्राथमिक आरोग्य केंद्र,  नावेली सरकारी माध्यमिक विद्यालय, डिचोलीतील शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय , डिचोली आयटीआय, डिचोलीतील राधाकृष्ण माध्यमिक विद्यालय, मयेतील पैरा माध्यमिक विद्यालय, पिळगावातील आयडियल शाळा, पिळगावातील सरकारी प्राथमिक शाळा या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.

विविध विभागांतून असंख्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आयएएस अजित रॉय यांनी या कामासाठी विविध विभागांमधून असंख्य कर्मचाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांना डिचोली तालुक्यातील मामलेतदारांकडे रिपोर्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेत. लसीकरण केंद्रांवर मामलेदारांकडून आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली जाईल. हा कर्मचारी वर्ग आरोग्य अधिकाऱ्यांना १८ ते ४४ वर्षं वयाच्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार आहे.

मामलेदारांकडून लसीकरण केंद्रांची पाहणी

डिचोली तालुक्याचे प्रविणजय पंडित यांनी यापूर्वीच साखळीतील सामाजिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई, मये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी  डॉ. सिद्धी कंसार, डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी  डॉ. मेधा साळकर यांच्यासह लसीकरण केंद्रांची पाहणी केली आहे.

राज्य सरकारला एकदा का लस उत्पादक कंपन्यांकडून लसींचा साठा मिळाला, की लगेच सामान्य नागरिकांना त्यांची नावं पोर्टलवर नोंदवण्याची सूचना दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचं लसीकरण सुरू होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!