ACCIDENT | काणकोण-आगोंद येथे कार झाडावर आदळली

अपघातात निवृत्त शिक्षक महाबळेश्वर देसाई यांचा जागीच मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात एका बाजूने कोविड महामारी, तर दुसऱ्या बाजूने अपघातांमुळे रोज मृत्यू होतायत. आगोंदा-काणकोण भागात असाच एक अपघात घडलाय. मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाला किरकोळ दुखापत झालीये.

हेही वाचाः ACCIDENT | खांडेपार येथे कार झाली पलटी

नक्की काय झालं?

मंगळवारी अगोंदा-काणकोण मार्गावरून जाताना एक कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. कार झाडाला आदळल्याने काराशीर मळ, आगोंदा येथील 82 वर्षीय महाबळेश्वर बाळकृष्ण फळदेसाई (म्हाबळु मास्तर) यांचा मृत्यू झाला. तर कार चालविणाऱ्या त्यांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.

कसा झाला अपघात?

पोलिसांच्या माहितीनुसार महाबळेश्वर बाळकृष्ण फळदेसाई आणि त्यांचा मुलगा त्यांच्या मारूती कारने काणकोणच्या दिशेने चालले होते. मुलगा मारूती कार चालवत होता. दुमाणे उतारावर समोरून येणारं वाहन चुकवण्यासाठी कार बाजूला घेण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून दरीत जाऊन कोसळली.

हेही वाचाः ACCIDENT | भीषण! कार-दुचाकीची टक्कर

चालकाला सुखरूप बाहेर काढलं

दरम्याने त्या रस्त्याने जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी गाडी दरीत कोसळल्याचं पाहिलं आणि ते फळदेसाई पिता-पुत्राच्या मदतीला धावले. बरेच प्रयत्न करून लोकांनी चालकाला गाडीच्या बाहेर काढलं. तर महाबळेश्वर फळदेसाई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडले होते.

तातडीने हॉस्पिटल गाठलं

उपस्थित लोकांनी तातडीने हालचाल करून स्थानिक पोलिस तसंच अग्निशमन दलाला कळवलं. तसंच 108 रुग्णवाहिका बोलावून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या फळदेसाईंना सामाजिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी महाबळेश्वर फळदेसाईंना मृत घोषित केलं. पोलिसांनी शव ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी ते मडगावातील हॉस्पिसिओ हॉस्पिटलमध्ये पाठवलंय.

मूळ मुडकुड गावचे महाबळेश्वर बाळकृष्ण फळदेसाई हे पेशाने शिक्षक असून ‘म्हाबळु मास्तर’ म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!