‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ ट्रस्टतर्फे कोविड योद्ध्यांसाठी ८ रुग्णवाहिका

कोविडमुळे पती गमावलेल्या स्त्रियांसाठी ट्रस्ट नजीकच्या भविष्यकाळात कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः निवृत्तीनंतर गोव्यात स्थायिक झालेल्या भारतभरातील सहा समविचारी व्यक्तींनी तयार केलेल्या ‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ या ट्रस्टने कोविड योद्ध्यांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ८ रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिल्या आहेत. या ट्रस्टने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा येथील जिल्हाधिकारी कार्यालयांना प्रत्येकी ४ अशा ८ रुग्णवाहिका देणगी म्हणून दिल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ दिल्ली साउथ एण्डचे माजी अध्यक्ष हेमंत भसिन यांच्या नेतृत्वाखाली सर्व विश्वस्तांनी मिळून ४६ लाख रुपयांची देणगी दिली आहे. यातील ११ लाख रुपये भसिन यांनी स्वत: दिले आहेत. आठ रुग्णवाहिकांशिवाय ‘सपोर्ट ग्रुपने फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ या ट्रस्टने ६ लाख रुपये किंमतीची वैद्यकीय उपकरणेही देणगी स्वरूपात दिली आहेत.

हेही वाचाः काणका-पर्रा रस्त्यावरील बेकायदा दुकानवजा गाळ्यांवर कारवाई

रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नसल्याने ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय

कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेचा गोव्याला मोठा फटका बसला. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात राज्यातील पॉझिटिविटीचा (केलेल्या चाचण्यांपैकी पॉझिटिव निकालाचा) दर ५१ टक्के होता. २४  एप्रिल ते ७ जून या ४२ दिवसांच्या काळात एकूण १,७९८ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. ‘सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’चे विश्वस्त हेमंत भसिन यांच्या मते, परिस्थिती खूपच चिंताजनक होती आणि ऑक्सिजन सिलिंडर्स, आयसीयू बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या स्वरूपात वैद्यकीय व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी प्रत्येकाला झगडावं लागत होतं. हे चित्र खूपच वेदनादायी होतं. गोव्यातील सरकार आणि स्थानिक प्रशासनाने हे अभूतपूर्व संकट हाताळण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि उत्तम काम केलं. गोव्याला आपलं निवृत्तीनंतरचं घर करणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांना राज्य सरकारला तसंच गोव्यातील कोविड योद्ध्यांना मदत करण्याची उत्कट इच्छा होती. कोविड योद्धे या संकटावर मात करण्यासाठी पुढे होऊन लढत होते. म्हणून आम्ही प्रशासनाशी संपर्क केला आणि आम्हाला सांगण्यात आलं की, रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नाही. मग आम्ही हा ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिल्या, असं भसिन म्हणाले.

हेही वाचाः 16 विटा, 16 रुप; चित्रकार अक्षय मेस्त्रीने रेखाटली विठ्ठलाची मनमोहक चित्रे

१२ मे २०२१ रोजी ट्रस्टची नोंदणी

‘द सपोर्ट ग्रुप ऑफ कोविड वॉरियर्स इन गोवा’ या ट्रस्टची नोंदणी १२ मे, २०२१ रोजी झाली आणि केवळ दोन आठवड्यांच्या काळात ट्रस्टचं उद्दिष्ट पूर्ण करण्याएवढा निधी उभा राहिला. रुग्णवाहिका दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातील अखेरची रुग्णवाहिका ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपवण्यात आली.

हे फोटो पहाः PHOTO STORY | ना पालखी सोहळा, ना वैष्णवांचा मेळा

संकटाने अत्युच्च बिंदू गाठलेला असताना खूप मदत झाली

ट्रस्टने केलेल्या या कामाची दखल म्हणून दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयांनी ट्रस्टला प्रशंसापत्रे (सर्टिफिकिट ऑफ अप्रिसिएशन) प्रदान केली आहेत. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष आयएएल रुचिका कट्याल यांच्यातर्फे प्राप्त झालेल्या प्रशंसापत्रात म्हटलं आहे की ‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ या ट्रस्टने जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय व्यवस्थेला कोविड-१९ साथीविरोधात लढण्यासाठी मोठी मदत केली आहे. त्यांनी नि:स्वार्थपणे ४ इको रुग्णवाहिका, १२५ ऑक्सिजन फ्लो मीटर रेग्युलेटर्स आणि १५० सी-पीएपी/बीआयपीएपी फुल फेस मास्क हे साहित्य अत्यंत गरजेच्या वेळी देणगी स्वरूपात पुरवलं. यामुळे संकटाने अत्युच्च बिंदू गाठलेला असताना खूप मदत झाली, असं भसिन म्हणाले.

हेही वाचाः मराठीत ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

भविष्यातील उपक्रम

भविष्यात दोन नवीन उपक्रम सुरू करण्याची आमची योजना आहे. प्रथम आम्ही कोविडमुळे पती गमावलेल्या स्त्रियांसाठी तसंच कोविडचा फटका बसलेल्या लोकांसाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार आहोत. कौशल्य विकास कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही हा कार्यक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यातही मदत करणार आहोत. दुसरं म्हणजे कोविडचा फटका बसलेल्या मुलांसाठी तसंच साथीमुळे ज्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आहे अशा मुलांसाठी एक सर्वांगिण हीलिंग कार्यक्रम घ्यायचा आहे. आम्ही गोवा प्रशासनाशी याबाबत चर्चा करत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही हे उपक्रम सुरू करणार आहोत. याशिवाय कोविड साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अधिक चांगल्यारितीने सज्ज राहण्याचा भाग म्हणून, आम्ही गोवा प्रशासनाला आणखी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय उपकरणं देणगी म्हणून देण्याच्या उद्देशाने निधी उभा करण्याचं काम सुरूच ठेवणार आहोत, असं भसिन म्हणाले.  

हा व्हिडिओ पहाः MGP | HIGH COURT | लवू मामलेदार यांची याचिका रद्दबातल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!