दुर्मिळ सागरी कासवाने घातली आगोंद समुद्रकिनाऱ्यावर अंडी

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
काणकोणः काणकोण तालुक्यातील आगोंद व गालजीबाग हे दोन समुद्रकिनारे सागरी कासवांसाठी आरक्षित आहेत. काणकोण तालुक्यातील आगोंद समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी पहाटे सातवे ऑलिव्ह रिडले जातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी आले. या कासवाने एकूण १५३ अंडी घातली असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हणून अंड्यांना सुरक्षित स्थळी हलवले
आगोंद किनाऱ्यावर एक ते दोन किलोमीटर अंतरावर सागरी कासव येऊन अंडी घालत असतात. कुत्र्यांपासून त्या अंड्यांचं रक्षण करावं लागतं. म्हणून सुरक्षितपणे ती अंडी सागरी कासवासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागी आणली जातात. आणि घरटी तयार करून, त्यांना जाळीचं संरक्षण दिलं जातं. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाने आगोंद समुद्रकिनाऱ्यावर घातलेली अंडी सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत. आगोंद आणि गालजीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांवरील इन्क्युबेशनच्या ठिकाणी ही अंडी सुरक्षितपणे ठेवण्यात आली असल्याची माहिती वाईल्ड लाईफचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) विक्रमादित्य नाईक गांवकर यांनी दिलीय.
वाईल्ड लाईफचे आरएफओ विक्रमादित्य नाईक म्हणाले….
अगोंद समुद्रकिनाऱ्यावर सात, तर गालजीबाग समुद्रकिनाऱ्यावर दोन ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांनी अंडी घातली आहेत. या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवरील अंडी मिळून आतापर्यंत एकूण ११७३ अंडी झाली आहेत. गुरुवारी रात्री १२.०५ च्या सुमारास सातवे ऑलिव्ह रिडले जातीचे कासव आगोंद समुद्रकिनाऱ्यावर आले आणि त्याने १५३ अंडी घातली असल्याची माहिती वाईल्ड लाईफचे आरएफओ विक्रमादित्य नाईक यांनी दिलीय.