मेळावलीव्यतिरीक्त दिवसभरात घडल्या ‘या’ महत्त्वाच्या घटना

दिवसभरातील महत्त्वाच्या घटनांवर धावता आढावा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मेळावलीतील आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळाले. मात्र मेळावलीसोबत इतरही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. चला तर मग घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या घडनांचा धावता आढावा..

१ सांगेतील ऊस उत्पादक शेतकरी नमले

गेल्या सलग चार दिवसांपासून सुरु असणारं शेतकरी आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतून तोडगा निघाल्यानं हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासोबतच आमदार प्रसाद गांवकर आणि माजी खासदार एड. नरेंद्र सावईकर या बैठकीला उपस्थित होते. अखेर या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय.

२ वाळपईत येणार नाही- मुख्यमंत्री

पीआय एकोस्करांना सस्पेंड करावं आणि मुख्मयंत्र्यांनी वाळपईत येऊन आमच्याशी चर्चा करावी, अशी मागणी मेळावलीतल्या आंदोलकांनी केली होती. मात्र ही मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावलीये. पोलिसांवरील हल्ला निषेधार्ह असून ग्रामस्थांवर गंभीर गुन्हे नोंदवणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर दहा सदस्यांचं शिष्टमंडळ आल्यासच चर्चा करुन असा निरोपही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिलाय.

मेळावली संदर्भातल्या सर्व बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

३ आम्ही नाही, तुम्हीच यायचं- आंदोलक

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आपला संदेश दिल्यानंतर आंदोलकांनीही प्रतिआवाहन केलंय. चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनींच आमच्याकडे यावं, असा टोला आंदोलकांनी लगावलाय. मुख्यमंत्र्यांचं आवाहनही आंदोलकांनी धुडकावून लागवलंय.

४ तरुण तेजपालची ट्रायल लांबणार

तेहलका साप्ताहीकाचे मुख्य संपादक असलेले तरूण तेजपाल यांच्याविरोधात त्यांच्याच एका महिला सहकाऱ्याने लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार दाखल केली होती. यावरून त्यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. सध्या तरूण तेजपाल यांची ट्रायल सुरू आहे. ही ट्रायल अंतीम टप्प्यात पोहचली असता आणि तिथे पोलिसांच्या हाती काहीच ठोस मिळत नसताना अचानक हे अतिरीक्त आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. त्यामुळे त्यांची ट्रायल लांबणार आहे. या संदर्भातलं सविस्तर वृत्त वाचवण्यासाठी इथे क्लिक करा.

५ आणखी एक रेल्वे दुपदरीकरण

तिनयघाट-कॅसलरॉक-करंझोळ रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला राष्ट्रीय वन्य जीव मंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला विरोध होत असतानाच झालेल्या या निर्णयाला महत्त्व प्राप्त झालंय.

६ कोरोना मृत्यूची नोंद नाही, सक्रिय रुग्ण घटले

गेल्या २४ तासांत राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या आता ९००च्या आत आली आहे. सध्या राज्यात ८७० एक्टीव्ह रुग्ण असून आतापर्यंत ७४४ रुग्णांचा मृत्यू झालाय. तर रिकवरी रेटमध्ये सुधार दिसून आला आहे.

७ कॅबिनेट बैठकीतील निर्णय

मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सीएसआर कामासाठी सरकार कंपनी स्थापन करणार असल्याचा निर्णय झालाय. तसंच वीज खात्याच्या ओटीएस योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सोबत पोषण अभियानासाठी ११ पदांची भरती करण्यात आली.

८ यूपीत निर्भया बलात्कार प्रकरणी पुनरावृत्ती

उत्तर प्रदेशात बदायूंमध्ये एका पन्नास वर्षीय महिलेवर दिल्लीतील निर्भया प्रकरणाप्रमाणे अत्यंत क्रूर पद्धतीने सामूहिक बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली आहे. या बलात्कार प्रकरणात वेदराम व यशपाल या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती, उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल त्वरित द्यावा, असा आदेश पोलिस प्रमुखांना दिला आहे. फरारी आरोपी महंत सत्यनारायण दास याला पकडण्यात मदत करणाऱ्याला, २५ हजाराचे इनाम देण्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. बदायूंचे पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी ही माहिती दिली.

९ केरळमधील पोरानं केली कमाल

एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या इंजिनिअरींग कौशल्याच्या बळावर चार मच्छीमारांना अरबी समुद्रात बुडण्यापासून वाचवले. देवांग सुबील असे त्याचे नाव. बचाव पथकाची बोट त्याला घेत नव्हती. अखेरीस महिला आमदाराने त्याला न्यायला सांगितले. भर समुद्रात तासाभरात त्याने ड्रोनच्या सहाय्याने चौघाही मच्छीमारांना शोधले. त्यातील एकजण बुडत होता. वर काढताच तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती सुधारत आहे. देवांग आज केरळमध्ये हिरो बनला आहे. करोनामुळे सुट्टी असल्याने तो घरी आला होता.

१० पोलिसांसाठी खूशखबर

पोलिस बढतीचा आदेश जारी करण्यात आला आहे. विविध विभागातील पोलिसांनी बढती जाहीर करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल असलेल्या ९५ जणांना असिस्टंट सब इन्स्पेक्टरपदी बढती देण्यात आली आहे.

११ पुरस्कार जाहीर

२०२० सालासाठीचे विश्व कोकणी केंद्राचे विमला पै साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. कृ. म. सुखठणकर यांच्या ‘धुमक्यार धुमके’ या पुस्तकाला आणि शैलेंद्र मेहता यांच्या ‘सिसिफस तेंगशेर’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुमठा येथील साहित्यिक डॉ. शिवराम कामत यांना कोकणीच्या सेवेसाठी जीवनसिद्धी गौरव प्राप्त झाला आहे. विश्व कोकणी केंद्राचे अध्यक्ष बस्ती वामन शणै यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले.

१२ घरचं कामही ऑफिस इतकंच महत्त्वाचं!

सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये गृहिणींसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. घरी काम करणाऱ्या गृहिणींचं कामही हे त्यांच्या ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामाइतकचं महत्वाचं असतं असं न्यायालयाने म्हटलं आहे. २०१४ साली दिल्लीत झालेल्या एका अपघातामध्ये मरण पावलेल्या दांपत्याच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये न्यायालायने हे निरिक्षण नोंदवलं आहे. याच प्रकरणाचा संदर्भ घेत न्यायालयाने गृहिणीसुद्धा देशाच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक जडघडणीमध्ये महत्वाचा वाटा उचलतात असंही म्हटलं आहे. प्रतिकात्मक पद्धतीने महिलांना वेतन देण्याच्या निर्णयाचं न्यायालयाने स्वागत केलं असून असं केल्यास सामाजिक समानता निर्माण होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल ठरेल असं म्हटंलं आहे. गृहिणींचा पगार किती असावा हे कसं ठरवावं यासंदर्भात काही ठोस साचेबद्ध नियम करता येणार नसले तरी त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळावा असा मुख्य हेतू यामागे हवा असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!