डोकेदुखी वाढली! 6 भारतीयांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण

ज्याची भीती होती, अखेर तेच झालं!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : ब्रिटनहून देशात परतलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या वाढतच असल्याचं समोर येत होतं. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ जणांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झाली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. पुणे, हैदराबाद आणि बंगळुरुत यूकेहून परतलेल्यांच्या स्वॅबचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यानंतर समोर आलेल्या रिपोर्टमधून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. भारतातही नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान नव्या कोरोना स्ट्रेनमुळे आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आणखी वाढेल, अशीही भीतीही व्यक्त केली जाते आहे.

गोव्यात काय स्थिती?

कारोनाचा नवा स्ट्रेन इंग्लंडमधून जगभर पसरू लागलाय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं खबरदारीचे उपाय अमलात आणायला सुरुवात केलीय. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसह कोरोनासंबंधीच्या अन्य मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीय. कारोनाचे रुग्ण कमी होत असतानाही नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही खबरदारी घेतलीय.

बाप आणि मुलगी फरार

दरम्यान, इंग्लंडहून गोव्यात दाखल झाल्यानंतर एक मुलगी आणि तिचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना मडगावच्या ईएसआय कोविड इस्पितळात उपचारांसाठी दाखल केलं होतं. मात्र कर्मचार्‍यांची नजर चुकवून त्यांनी पलायन केलं. त्यांचा शोध घेतला असता, ते शिरोड्यात असल्याचं कळताच त्यांना ताब्यात घेउन पुन्हा मडगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं.

गर्दीला रोखणार कसं?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारी यंत्रणेकडून होत असताना पर्यटकांकडून मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातोय. असाच प्रकार हरमल समुद्रकिनारी पाहायला मिळाला. इथं आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली.

काय आहे नवा कोरोना स्ट्रेन?

कोरोनाचा नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये आढळून आलाय. त्यानंतर सर्व देशांनी ब्रिटनहून परतेलल्यांच्या चाचण्या सुरु केल्या आहे. कोरोना नवा प्रकार जास्त संसर्गजन्य असल्याचं अभ्यासातून उघड झालं आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन ७० टक्के जास्त वेगानं पसरतो, असा दावा केला जातोय. त्यामुळे खबरदारची उपाय म्हणून ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आलाय. तर दुसरीकडे ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर भारत सरकारनं आधीच बंदी घातली आहे.

मात्र ही शेवटची विमानं देशात दाखल झाली, त्यातून यूके रिटर्न असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होते. ही संख्यादेखील वाढत होती. दरम्यान, जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये परिक्षणासाठी पाठवण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!