‘म्युकरमायकोसिस’चा गोव्यात शिरकाव; जीएमसीत सापडले सहा रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: म्युकरमायकोसिस आजाराने गोव्यात प्रवेश केला असून, सध्या गोमेकॉत अशा सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गोमेकॉत ऑक्सिजनअभावी रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत रुग्ण दगावत असल्याचा दावा आरोग्य सचिव रवी धवन यांनी स्पष्टपणे फेटाळला.
सहाही जणांची प्रकृती उत्तम
उच्च मधुमेह तसंच स्टिरॉईडचा गैरवापर करणार्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा फैलाव होतो. सध्या गोमेकॉत कोविडचे उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं डॉ. बांदेकर म्हणाले. म्युकरमायकोसिस आजार प्राथमिक अवस्थेत सापडला आणि रुग्णावर तत्काळ उपचार झाले तर कोणताही धोका नसतो. गोमेकॉतील सहा रुग्णांवर डॉक्टरांनी तत्काळ आधुनिक उपचार सुरू केले. त्यामुळे सहाही जणांची प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी नमूद केलं. मधुमेह असलेल्यांनी करोनाची लक्षणं दिसताच तत्काळ उपचारांसाठी दाखल होणं गरजेचं आहे. अन्यथा त्यांनाही म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागू शकतो, असंही डॉ. बांदेकर म्हणाले.
हेही वाचाः स्माईल्स फाऊंडेशननं फुलवलं हजारोंच्या चेहर्यावर हास्य…
ऑक्सिजनअभावी करोनामृतांचा दावा आरोग्य सचिवांनी फेटाळला
दरम्यान, गोमेकॉत रात्री २ ते पहाटे ६ पर्यंत होत असलेल्या कोविड मृत्यूंबाबत पत्रकारांनी आरोग्य सचिव रवी धवन यांना छेडलं. पण या वेळेत ऑक्सिजनअभावी गोमेकॉत करोनाबाधितांचा मृत्यू होतो ही बाब चुकीची आहे, असं ते म्हणाले. आरोग्य खात्याकडून दररोज जारी होत असलेल्या बुलेटिनमध्ये चोवीस तासांतील मृतांचा आकडा दिला जातो. काही दिवसांपासून डीन बांदेकर स्वत: उपस्थित राहून रात्रीच्या वेळी पाहणी करत आहेत. पण, ऑक्सिजन न मिळाल्यानेच २ ते ६ या वेळेत रुग्णांचे मृत्यू होत असल्याचं दिसून आलं नाही. काही वैद्यकीय कारणांमुळे करोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मृत्यू केवळ गोमेकॉतच होतात, इतर ठिकाणी होत नाहीत का, याचंही उत्तर शोधलं पाहिजे, असं ते म्हणाले. रात्रीच्या मृत्यूंच्या दाव्यामुळे गोमेकॉसंदर्भात नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही भीती दूर होण्याची नितांत गरज आहे. गोमेकॉतील रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक तितका ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. तेथील सर्व व्यवस्था सुरळीतपणे चालली आहे. त्यामुळे करोनाबाधितांपेक्षा करोनातून मुक्त होणार्यांची संख्या वाढत चालली आहे, असंही धवन यांनी नमूद केलं.
हेही वाचाः खाजगी इस्पितळांसाठी सरकारी समन्वयकांची नेमणूक
करोना नियंत्रणासाठी सरकारचे पूर्ण सहकार्य
गोव्यात कोविडची दुसरी लाट शिखरावर असल्याचे मत साथीचे रोग तज्ज्ञ करत आहेत. पण त्याचा अंदाज येण्यासाठी आणखी तीन-चार दिवस वाट पाहावी लागेल, असं आरोग्य सचिव रवी धवन म्हणाले. करोना नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनसुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. विदेशातूनही राज्याला मदत मिळत आहे. लसीकरणालाही पुढील काळात गती मिळेल, अशी हमीही त्यांनी दिली.