VACCINATION | राज्यात ५५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही?

लस घेण्याबाबत वैद्यकीय अधिकारी, राजकारण्यांकडून दिशाभूल - डॉ. साळकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम २५ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. मात्र, गोव्यातील ५५ टक्के वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनीच लस अजूनपर्यंत घेतलेली नाही. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणालाही प्रतिसाद मिळत नसून त्यांचेही अद्याप २० ते ३० टक्केच लसीकरण झालंय. राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लस सुरक्षित असल्याचं म्हणत असताना राज्यातील काही वैद्यकीय अधिकारी व राजकारणी दिशाभूल करत आहेत, असं वक्तव्य डॉ. शेखर साळकर यांनी केलं. भाजप महिला मोर्चा व वैद्यकीय सेवा शाखेतर्फे हाउसिंग बोर्ड येथील दामोदर मंदिराच्या मंडपात अस्थिरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दामू नाईक, डॉ. अमेय वेलिंगकर, डॉ. स्नेहा भागवत, रंजिता पै, सुनिता पराडकर, सुगंधा बांदेकर, बबिता नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी उपस्थितांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

हेही पहाः Politics | Congress | संकल्प आमोणकरांचा सरकारवर सनसनाटी आरोप

करोना लसीकरणातही राजकारण

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. साळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, याआधी करोनाची लस कधी येणार असा सवाल केला जात होता. आता लस दाखल झाल्यानंतर करोनाच्या लसीचा त्रास होणार असं म्हटलं जातंय. आपण कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड अशा दोन लसी घेतलेल्या असून आपणास काहीही झालेलं नाही. काही राजकीय फायद्यासाठी ही लस घेऊ नका म्हणून सांगतात. आयसीएमआर, नॅशनल इन्सिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे तज्ज्ञ वैद्यकीय अध‌िकारी करोनाची लस घ्या म्हणून सांगतात. तर राज्यातील काही वैद्यकीय अधिकारी व राजकीय नेते लस घेऊ नका असं सांगत आहेत, असंही साळकर म्हणाले.

विरोधकांची विरोधाला विरोध करण्याची सवय

माजी आमदार दामू नाईक यांनी सांगितले की, करोनाच्या काळात सर्वांनाच आरोग्याचं महत्त्व कळलं असून प्रत्येकाने बाहेरील खाणं सोडून सकस आहार घेण्यावर भर दिला. राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ सर्व स्तरातील लोकांना व्हावा, यासाठी भाजपचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. विरोधकांची नेहमीची विरोधाला विरोध करायची सवय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून करोनाची लस सर्वांनी घेऊया, असंही सांगितलं.

हेही पहाः Corona Vaccination | राज्यात कोरोना लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद नाही

डॉ. शेखर साळकर म्हणाले….

लस घेतल्यानंतरही सामाजिक अंतर राखणं, मास्क परिधान करणं अशा गोष्टी करणं सर्व लोकांचं लसीकरण होईपर्यंत बंधनकारक आहे. १५ ते १६ हजार लोकांनी गोव्यात लस घेतली असून एका व्यक्तीला सोडल्यास अन्य कोणालाही त्रास झालेला नाही. काही राज्यात पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!