आनंदाची बातमी : यावर्षी कला अकादमीच्या भजन स्पर्धा होणार !

41 व्या पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजन स्पर्धेची मंत्री गोविंद गावडे यांनी केली घोषणा

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजी : सर्व गोंयकारांना मोठी उत्सुकता लागुन असलेली कला अकादमी आयोजित 41 वी पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजन स्पर्धा यावर्षी घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

देशभरातच नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेली ही महत्वाची स्पर्धा गेल्या वर्षी कोविडमुळं घेता आली नाही. यावर्षीही ही स्पर्धा होणार ही नाही, याबाबत गोंयकारांमध्ये मोठी उत्सुकता लागुन होती. अखेर ही स्पर्धा घेण्याचं निश्चित करण्यात आलं. राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली.

दि. 5 ऑगस्टपासून प्रवेशिका उपलब्ध होतील. 15 ऑगस्टपासून विभागीय फेरीला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेच्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. कोविडमुळं पथकातील सहभागी कलाकारांची संख्या कमी करण्यात आलीय. यावर्षी कमीत कमी 8 व जास्तीजास्त 12 कलाकारांना सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर यावर्षी फक्त महिला व पुरूष या गटात स्पर्धा होतील. मुलांच्या स्पर्धा होणार नाहीत. स्पर्धेच्या ठिकाणी लॉटस काढण्याऐवजी आता लॉटस अगोदर पथकांना कळवले जातील. पथकाच्या नावातील मराठी मुळाक्षरातील बाराखडीच्या अक्षरक्रमानुसार सादरीकरणाचा क्रम निश्चित करण्यात येईल.

कोविडच्या नियमांमुळं स्पर्धेची ठिकाणेही निश्चित करण्यात आलीयेत. यात रविंद्र भवन, साखळी, राजीव गांधी कला मंदीर फोंडा, कला व संस्कृती संचालनालय, पणजी, पेडणेवासियांसाठी श्री संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय सभागृह, रविंद्र भवन, मडगाव आणि रविंद्र भवन कुडचडे यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारचे कोविडबाबतचे सर्व नियम पाळून तसंच उत्तर व दक्षिण जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी घेवून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचंही मंत्री गावडे यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!