आतापर्यंत 4 वेळा कोरोना पॉझिटिव्ह, आता प्लाझ्मा देऊन वाचवतोय लोकांचा जीव!

दोन वेळा प्लाझ्मा दान करुन कोरोना रुग्णांचा वाचवला जीव !

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे आरोग्य विभागासमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी दिल्लीमध्ये एक व्यक्ती असा आढळून आला आहे, ज्याला आतापर्यंत तब्बल 4 वेळा कोरोनाची लागण झाली आहे. साऊथ दिल्लीच्या कोटला मुबारकपूर इथल्या खैरपूर गावचा रहिवासी 37 वर्षीय योगेंद्र बैसोया नावाच्या व्यक्तीला जून 2020 पासून आतापर्यंत 4 वेळा कोरोना झाला आहे. दुसऱ्या वेळी त्यांनी ऑक्सिजन सपोर्टचीही गरज भासली. पण इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांची प्रकृत्ती एकदम ठणठणीत आहे. इतकंच नाही तर ते आता अन्य कोरोना रुग्णांची मदतही करत आहेत. योगेंद्र बैसोया यांना आतापर्यंत 4 वेळा कोरोनाची लागण झाली आहे. योगेंद्र यांना दुसऱ्या वेळी कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांची प्रकृती काहीशी बिघडली होती. त्यावेळी त्यांना ऑक्सिजनचीही गरज भासली. पण योग्य उपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते आता निरोगी आयुष्य जगत आहेत. इतकंच नाही तर योगेंद्र हे कोरोना रुग्णांची मदत करत आहे. त्याचबरोबर गरजू रुग्णाला ते प्लाझ्मा दान करत त्यांचं आयुष्य वाचवत आहेत.

NTB ने दिलेल्या वृत्तानुसार, योगेंद्र बैसोया हे सर्वात प्रथम जून 2020 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तेव्हा योग्य उपचार आणि गोळ्या, औषधांमुळे ते बरे झाले. सप्टेंबरमध्ये त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्यांची तब्येत काहीशी बिघडली आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागला. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये ते पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह आले. पुढे एप्रिलमध्येही त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता त्यांची तब्येत चांगली आहे. योगेंद्र हे सतत कोरोना पॉझिटिव्ह येत असल्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतित आहेत. मात्र, योगेंद्र हे आपण नशीबवान असल्याचं सांगत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.

योगेंद्र यांनी सांगितलं की, ते कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करत आहेत. आतापर्यंत दोन वेळा प्लाझ्मा दान करुन कोरोना रुग्णांचा जीव वाचवल्याचं त्यांनी सांगितलं. आपण पुढेही प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. सातत्याने मास्कचा वापर, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग गरजेचं असल्याचं योगेंद्र सांगतात. तुम्हाला साधारण लक्षणं दिसून आली तर तुम्ही तातडीने आयसोलेट व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, असंही योगेंद्र आवर्जुन सांगतात.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!