पेट्रोल-डिझेल करापोटी देशवासीयांकडून केंद्रांनं उकळले तब्बल 4 लाख कोटी !

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात जनतेला कसा दिलासा दिला जात होता, याचा हवाला देत प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, पेट्रोल आणि डिझेलवरील करात १२ पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे. या संदर्भात त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.  प्रियांका गांधी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या, “२०१३ साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०१ डॉलर्स होते तेव्हा त्यावेळी देशातील लोकांना पेट्रोल ६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५१ रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. त्यावेळी केंद्र सरकार पेट्रोल प्रति लीटर ९ रुपये तर डिझेलवर ३ रुपये प्रति लीटर कर आकारत होती. पण सन २०२१ मध्ये केंद्र सरकार आपल्याकडून पेट्रोल प्रतिलिटर ३३ रुपये आणि डिझेलवर ३२ रुपये कर वसूल करत आहे. भाजपा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १२ पट वाढ केली आहे.”

प्रियांका गांधी म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशवासीयांना त्याचा फायदा का देण्यात आला नाही? २०१४ पासून कर वसुलीत ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ योग्य आहे का? केंद्र सरकारने ७ वर्षात पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून २१.५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. पण त्या बदल्यात मध्यमवर्गीय, गरीब आणि व्यापारी वर्गाला काय मिळाले? संकटाच्या वेळीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या रुपात केंद्र सरकारने देशवासीयांकडून सुमारे ४ लाख कोटी रुपये वसूल केले.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!